Mumbai Accident:मुंबईतील वांद्रे परिसरात एका भरधाव कारची धडक बसल्याने आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अंश गुप्ता ( वय 8) या लहान मुलाचा मृत्यू झाला.
रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून (Bandra Police) आरोपी महिला कारचालक महिला मेघा रावल हिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला कार चालकाविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये कलम 105, 281, 125 भारतीय न्याय संहिता (BNS) सहकलम 184 मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Road Accident news)
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी दुपारी 2:30 च्या सुमारास वांद्रे पश्चिम जिजामाता रोड समोर असलेला जॉन बाप्टिस्ट रोडवर ही घटना घडली होती. वांद्रे पश्चिम परिसरात जिजामाता गार्डनसमोर 8 वर्षीय अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत होता. त्यावेळी आरोपी महिला मेघा रावल हिची गाडी रस्त्यावरुन येत होती. ती गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होती. या नादात तिला अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत असल्याचे लक्षात आले नाही आणि तिने अंशला गाडीने उडवले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंश गुप्ता यास उपचारासाठी हॉली फॅमिली हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणात आरोपी वाहन चालक महिलेविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पुढील तपास वांद्रे पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी मेघा रावल हिच्यावर मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा अतिवेगाने व निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा ठपका ठेवला आहे.
तत्पूर्वी काल सकाळी घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर झालेल्या अपघातामध्येही दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. आर्यन आलोकनाथ पासवान (15) आणि गणेश सुनील महामुनी (14) राहणार सिद्धार्थ नगर, घाटकोपर या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या भटवाडी सिद्धार्थ नगर परिसरात ही दोन्ही मुलं कुटुंबासह राहतात. गणेशने पहाटे घरातून वडिलांची स्कूटी घेतली आणि आर्यन ला मागे बसवून घेऊन निघाला. स्कूटी चालवत हे दोघे ही घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर आले. दुचाकी जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या खाली आली असता मागून भरधाव वेगाने प्रकाश बलदेवराम चहर (34) हा चालक कंटेनर घेऊन आला आणि त्याने यांच्या स्कुटीला धडक दिली. दोघेही मुले या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. या दोघांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात
समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनर ट्रकला पाठीमागून धडकून अपघातात
एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर अपघातात ट्रॅव्हल्स मधील दहा प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहे. हेमंत हरिश्चंद्र दाभाडे वय ६५ वर्षे राहणार वैजापूर असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे. तर अपघातात अन्य दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

