Siddhesh Lad Replace Shardul Thakur Mumbai Captain Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या आगामी 2026-27 हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल करण्यात आला आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड याच्याकडे मुंबईच्या संघाची नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे सलग दुसऱ्या रणजी हंगामात मुंबईला नवा कर्णधार मिळणार आहे. मागील हंगामात अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने मुंबईचे नेतृत्व केले होते. आता त्याच्या जागी सिद्धेश लाड कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष राजेश पवार यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
'2026-27 रणजी हंगामासाठी सिद्धेशची कर्णधार म्हणून निवड करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मागील हंगामात त्याने चांगली कामगिरी केली असून तो अनुभवी खेळाडू आहे. शार्दुल आमचा मॅचविनर आहे. त्याच्यावर आधीच गोलंदाजी, विकेट्स घेणे आणि फलंदाजीची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्याच्यावर कर्णधारपदाचा अतिरिक्त भार टाकायचा नाही,' असे राजेश पवार यांनी सांगितले.
रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 10 सामने खेळावे लागणार असल्याने शार्दुलचा वर्कलोड मॅनेजमेंटही महत्त्वाचे ठरणार आहे. गरजेनुसार त्याला एखाद्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे त्याच्यावरील कर्णधारपदाची जबाबदारी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयापूर्वी सिद्धेश लाड आणि शार्दुल ठाकूर या दोघांशीही चर्चा करण्यात आली होती. दोन्ही खेळाडूंनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ऑक्टोबरमध्ये रणजी हंगामातील सुरुवातीचे चार सामने खेळायचे असल्याने कर्णधारपदाबाबत आधीच स्पष्टता ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिद्धेश लाडची बॅट तळपली
सिद्धेश लाडसाठी मागील रणजी हंगाम दमदार ठरला होता. 2025-26 रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने 8 सामन्यांत 774 धावा केल्या. त्याची फलंदाजीची सरासरी तब्बल 77.40 इतकी होती. विशेष म्हणजे या हंगामात त्याने तब्बल 5 शतकं झळकावली. त्यामुळे मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने हंगाम गाजवला. 34 वर्षीय सिद्धेश लाडचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अनुभवही मोठा आहे. त्याने आतापर्यंत 82 प्रथम श्रेणी सामन्यांत 5,623 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 44.27 असून त्याच्या नावावर 15 शतकं आणि 30 अर्धशतकं आहेत.
11 ऑक्टोबरला मुंबईचा पहिला सामना
2026-27 रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आपल्या मोहिमेची सुरुवात 11 ऑक्टोबरपासून चंदीगडविरुद्ध करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मुंबईला एलिट ग्रुप डीमध्ये स्थान देण्यात आले असून या गटात चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, रेल्वे, तामिळनाडू आणि उत्तराखंड या संघांचा समावेश आहे. मुंबईने अखेरची रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. आता सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखाली 42 वेळच्या रणजी चॅम्पियन मुंबईला पुन्हा एकदा जेतेपद मिळवून देण्याचे आव्हान असेल.
Author : किरण महानवर

