Mumbai Crime Accident Bandra: मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी महिला चालकाने एका आठ वर्षांच्या लहान मुलाला कारने चिरडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये आठ वर्षांच्या अंश गुप्ता याचा मृत्यू झाला होता.
अंश गुप्ता हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तब्बल 15 वर्षांनी गुप्ता कुटुंबीयांच्या घरी पाळणा हलला होता. मात्र, या अपघातात (Raod Accident) अंशचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मेघा रावल (Megha Rawal) हिने कार चालवताना अंशला चिरडले होते. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास वांद्रे पश्चिम जिजामाता रोड समोर असलेला जॉन बाप्टिस्ट रोडवर हा अपघात झाला होता. अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत होता. त्यावेळी आरोपी महिला मेघा रावल हिची गाडी रस्त्यावरुन येत होती. ती गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होती. या नादात तिला अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत असल्याचे लक्षात आले नाही आणि तिने अंशला गाडीने चिरडले होते. यानंतर पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी मेघा रावल हिच्या कुटुंबीयांनी साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. (Road Accident news)
मेघा रावल ही पेशाने फिटनेस कोच आणि न्युट्रिशनिस्ट आहे. रावल कुटुंबीय सधन आहेत. त्यामुळेच या अपघातानंतर पोलिसांनी मेघाला पकडल्यानंतर रावल कुटुंबीयांनी या अपघाताचा साक्षीदार असलेल्या संदीप सिंह याला विकत घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी मेघा रावलच्या परिवाराकडून प्रत्यक्षदर्शी असलेल्या संदीप सिंह यांना जबाब बदलण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणात संदीप सिंह यांना गप्प राहण्यासाठी आरोपीच्या परिवाराकडून आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप स्वत: संदीप सिंह यांनी केला होता. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात साक्षीदाराला फितवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रावल कुटुंबीयांवरही कारवाई करणार का, हे बघावे लागेल.
Mumbai news: मेघा रावलची कार वेगात अन् मोबाईलने घात केला
प्रत्यदर्शींच्या माहितीनुसार, हा अपघात घडला तेव्हा मेघा रावल हिची कार खूप वेगात होती. ती मोबाईलवर बोलत असल्याने अंश गुप्ता समोर आल्यानंतर तिला पटकन कारवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे तिची कार अंशच्या अंगावरुन गेली. गाडीची पुढची आणि मागची डाव्या बाजूची चाके मुलाच्या छातीवरुन गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 2 सप्टेंबरला अंशचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वांद्रे पोलिसांनी मेघा रावल हिच्यावर कलम 105, 281, 125 भारतीय न्याय संहिता (BNS) सहकलम 184 मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

