राज्यातील अपघातांची मालिका अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळत असून दोन दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
आता, मुंबई-गोवा महामार्गवर भीषण अपघात झाला असून अपघातात दोघे जागीच ठार झाले असून दोन जण जखमी असल्याची माहिती आहे.
रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुबंई-गोवा महामार्गवर पोलादपूर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीतील ही घटना आहे, या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दापोली कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले कर्मचारी अनिल मारकड हे कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

