सॅन होजे (कॅलिफोर्निया): अमेरिकेतील स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी संस्था (ICE) यांच्या अलीकडील कारवायांच्या पार्श्वभूमीवर"Undocumented.PDF" हा लघुपट तयार करण्यात आला आहे.
हा लघुपट NAFA Filmsच्या बॅनरखाली निर्मित करण्यात आला असून, NAFA Film Festival 2026 मध्ये कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे त्याचा प्रीमियर होणार आहे. या लघुपटाची कथा कॅलिफोर्नियास्थित लेखिका अमृता हार्डीकर यांनी लिहिली असून, ह्यूस्टनस्थित हर्ष महाडेश्वर यांनी दिग्दर्शन केले आहे. अमेरिकेचे काँग्रेसमन श्री ठाणेदार आणि NAFAचे संस्थापक अभी घोलप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर कॅलिफोर्नियातील अमोल थिटे आणि गोविंद उंकळकर हे सहनिर्माते आहेत.
Undocumented.pdf'चा वर्ल्ड प्रीमिअर
'Undocumented.pdf' या लघुपटाची निर्मिती NAFAने केली असून अमेरिकेतील इमिग्रेशन या संवेदनशील विषयावर हा चित्रपट आधारित आहे. या लघुपटाचाही जागतिक प्रथम प्रयोग (World Premiere) याच महोत्सवात होणार आहे.अमेरिकेतील ICE च्या अंमलबजावणी कारवायांबाबत सध्या दोन भिन्न मतप्रवाह दिसून येत आहेत. समर्थकांच्या मते, कठोर कारवाईमुळे स्थलांतर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होते, बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या व्यक्तींवर कारवाई करता येते आणि सार्वजनिक सुरक्षेला बळकटी मिळते.दुसरीकडे, टीकाकारांचे म्हणणे आहे की, अशा कारवायांमुळे स्थलांतरित समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अनेक कुटुंबे विभक्त झाली आहेत आणि काही प्रकरणांमध्ये प्रलंबित स्थलांतर अर्ज असलेल्या किंवा अनेक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाही त्याचा फटका बसला आहे.याच संवेदनशील विषयावर भाष्य करणारा "Undocumented.PDF" हा लघुपट आगामी NAFA Film Festival 2026 मध्ये प्रथमच प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे.
काय म्हणाले अभिजित घोलप?
NAFAचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, "यंदाचे वर्ष NAFAसाठी ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र शासनाचे सहकार्य ही केवळ प्रशासकीय भागीदारी नसून मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रवासाला नवी ऊर्जा देणारी ताकद आहे. शासनाच्या पाठबळामुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक भक्कम व्यासपीठ मिळत आहे."
ते पुढे म्हणाले, "यंदा भारत, अमेरिका आणि इतर देशांतून विक्रमी संख्येने चित्रपट प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यामुळे अंतिम निवड प्रक्रिया अत्यंत कठीण होती. चित्रपटांची निवड करताना मनोरंजनाबरोबरच त्यांचा आशय, दिग्दर्शन, पटकथा, अभिनय, संकलन, छायांकन आणि जागतिक प्रेक्षकांवर होणारा परिणाम या निकषांचा विचार करण्यात आला."
Author : abp majha web team

