Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नकाराला स्वीकारणं....एक आव्हान

नकाराला स्वीकारणं....एक आव्हान

युष्यात सर्वात आव्हानात्मक गोष्टींची यादी आपण केली तर त्यात पहिल्या पाचांमध्ये येणारा घटक म्हणजे नकाराला स्वीकारणं. अर्थात हे माझं मत आहे. नकार... म्हणायला फक्त तीन अक्षरी शब्द आहे....पण, त्या नकार स्वीकारण्याने किंवा न स्वीकारण्याने आयुष्य बदलून गेल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला पाहतो.

वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सगळीकडेच या नकाराचा रोल फार मह्त्त्वाचा असतो. यामध्ये मला जास्त फोकस सध्या करायचाय तो लहान वयावर. अर्थात संस्कारक्षम वयावर. पाच ते पंधरा या वयोगटातल्या मुलांचं मन हे मातीच्या गोळ्यासारखं असतं. त्याला आकार द्याल तसं ते घडतं. त्याच वयात म्हणजे पाच वर्षांपासून थोडंसं कळू लागल्याने मागण्या खरं तर हट्ट वाढलेले असतात. हेच हवं, असंच हवं, इतकंच हवं. एक ना अनेक. याच वेळी आईवडील मुलाला हवं तेव्हा हवं ते देत गेले तर, त्याचा आनंद तुम्हाला तात्पुरता सुखावेल. पण, दीर्घकालीन विचार केल्यास ही धोक्याची पहिली पायरी आहे. जिथे तुम्ही मुलांच्या मागण्यांना ब्रेक लावायला हवा. अशा डिमांड्सचं रुपांतर पुढे हव्यासात झालं तर नुकसान होतं.

एखादी महागडी वस्तू, ड्रेस, महागड्या हॉटेलचं जेवण अगदी काहीही या लिस्टमध्ये असू शकतं. केवळ मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदापोटी तो म्हणेल तसं प्रत्येक वेळी आपण करत गेलो तर पुढे थोडं मोठं झाल्यावर हीच महत्त्वाकांक्षा हव्यासामध्ये बदलली जाते आणि वाटचाल खडतर होते. सगळंच बिनसत जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि कॉर्पोरेट कल्चरच्या युगात आईवडील मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. याचंही गिल्ट काही वेळा त्यांच्या मनात असतं. म्हणूनही मुलांचे लाड अनेकदा पुरवले जातात. त्यात सध्या छोट्या कुटुंबात म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकच मूल (हम दो हमारा एक) कुटुंबात असतं. याहीवेळी ही डिमांडिंग सवय वाढत जाते. एकाच मुलावर आईवडिलांचं लक्ष केंद्रित असतं. साहजिकच लाड, प्रेम, कौतुक सर्व काही त्याचंच होत असतं. ही आईवडिलांसाठी फार ट्रिकी सिच्युएशन आहे. 'मागाल ते पुरवू'चा फार चुकीचा संदेश या मुलांमध्ये जातो. पुढे मुलं फार आक्रस्ताळी, मनमानी करणारी होऊ शकतात. जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठीही घातक आहे. म्हणून अगदी याच म्हणजे पाच ते पंधरा वयातच आईवडिलांनी मुलांना ग्रेसफुली नकार द्यायला हवा आणि तो तितक्याच खिलाडूवृत्तीने पचवायलाही शिकवायला हवा.

काळानुरूप खूप गोष्टींची उपलब्धता असणं हाही फॅक्टर यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे आमची पिढी जेव्हा पाच वर्षांची होती म्हणजे ८० च्या दशकात...तो काळ आणि आताची पिढी जेव्हा पाच वर्षाच्या वयोगटात आहे म्हणजे २०२६ चा काळ. आजूबाजूला जग प्रचंड बदललंय. आपला जगण्याचा वेग वाढलाय, आर्थिकदृष्ट्याही परिस्थिती बदलल्याने पर्चेसिंग पॉवर अर्थात वस्तू किंवा सेवा विकत घेण्याची क्षमता वाढलीय. यामुळे मनोरंजनाचे, एन्जॉयमेंटचे पर्याय रुंदावलेत. वाढलेत, त्यात फाईव्ह जीच्या वेगाने सुटणाऱ्या मनाच्या घोड्याला लगाम घालणं कठीण आहे. म्हणूनच आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत असलं तरी त्या गोष्टीची मुलांना त्या वेळी खरंच गरज आहे का हा विचार ठराविक वयानंतर तरी व्हायलाच हवा. नाहीतर आपल्या प्रत्येक मागणीला आईवडील होकारार्थी घेऊन ती मान्य करतायत, हा अत्यंत चुकीचा मेसेज मुलांमध्ये जातो. अमृता सुभाष एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर एका एपिसोडमध्ये फार खोलवर विचार करायला लावणारं वाक्य बोलली होती... ती म्हणाली होती, आपण सकारात्मक होण्यासोबतच स्वीकारात्मक व्हायला हवं. या एका वाक्यातच सारं आलं. या स्वीकारात्मक शब्दात अनेक स्वीकार आहेत तसाच नकाराचाही स्वीकार अपेक्षित आहे. हे लिहिणं म्हणजे कुणाला काही शिकवण्याचा हेतू नाही, किंवा कुणाला टोकण्याचाही हेतू नाही. आयुष्याच्या या बाजूकडेही अतिशय डोळसपणे आणि तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न इतकाच याचा हेतू आहे.

Author : अश्विन बापट, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha