Nashik Crime News: नाशिकमधील सातपूर परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तथाकथित पत्रकार रवींद्र एरंडे याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत 4 मोबाईल फोन जप्त केले असून, त्यातील 'डाटा' रिकव्हर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे, तपासादरम्यान आतापर्यंत 8 पीडित महिलांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपीवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Nashik Crime News: फिर्यादीच निघाला मुख्य सूत्रधार
हे प्रकरण अत्यंत नाट्यमयरीत्या उघडकीस आले. काही दिवसांपूर्वी रवींद्र एरंडे याने स्वतः सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, चार जण त्याला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 12 लाख रुपयांची खंडणी मागत आहेत. पोलिसांनी या चार जणांना अटक केली खरी, मात्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले. एरंडेच्या टॅबमध्ये तब्बल 87 अश्लील व्हिडिओ सापडल्याने, खंडणी मागणाऱ्या तक्रारदाराचाच खरा चेहरा समोर आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
Nashik Crime News: तपासातील हादरवणारी माहिती
पोलिसांनी एरंडेच्या ताब्यातून 4 मोबाईल, 2 पेनड्राइव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केले आहे. तसेच त्याच्या ऑफिसवर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. या मोबाईलमधील डिलीट केलेला डाटा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे. आरोपीने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते. तपासात आतापर्यंत 8 पीडितांची ओळख पटली असून, यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. तर हे व्हिडिओ केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते की त्यांची 'ब्लू फिल्म' म्हणून विक्री केली जात होती, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. नाशिक आणि इगतपुरीतील विविध हॉटेल्समध्ये हे चित्रीकरण केल्याचा संशय आहे.
Nashik Crime News: आज पुन्हा कोर्टात हजर करणार
रवींद्र एरंडेची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे दुपारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे आणि या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, हे शोधण्यासाठी पोलीस त्याची कोठडी वाढवून मिळण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.
Nashik Crime News: भोंदू बाबा खरातनंतर नाशिकमधील दुसरं प्रकरण
नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच, एका एनजीओ चालकाने आणि स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या व्यक्तीने शंभरहून अधिक महिलांचे शोषण केल्याचा संशय व्यक्त होत असल्याने शहरात संतापाची लाट आहे. आरोपीवर सध्या बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Author : शुभम बोडके

