Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना

Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना

ABP माझा 1 week ago

बुधवारी सकाळी नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यानंतर आतापर्यंत 289 मृतदेह सापडले आहेत. सुमारे 1500 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळी नागरिकांसोबतच मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

नेपाळमध्ये लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस पथके बेपत्ता झालेल्यांचा सतत शोध घेत आहेत. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर आणि इतर साधनांनी बाहेर काढले जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमधील 288 भारतीय नागरिकांशी अजूनही संपर्क झालेला नाही. यापैकी 73 जण त्रिशुली-1 वीज प्रकल्पात काम करतात. पुरात अडकलेल्या 21 भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 11 जणांची ओळख पटली आहे.

भूस्खलनाचा धक्का 5.2 तीव्रतेच्या भूकंपासारखा

नेपाळ-चीन सीमेजवळ भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) सुरुवातीला हा 4.4 तीव्रतेचा भूकंप असल्याचे सांगितले. पण नंतर असे आढळून आले की, बर्फ आणि खडकांसह पर्वताचा एक मोठा भाग ल्हेंडे खोला नदीत कोसळला होता. ल्हेंडे खोला ही भोटेकोशी नदीची उपनदी आहे, जी चीनमध्ये उगम पावते आणि नेपाळमध्ये प्रवेश करते. यूएसजीएसने (USGS) नंतर स्पष्ट केले की, 5.2 तीव्रतेचा हा भूकंप भूस्खलनामुळे झाला होता.

नेपाळमधील 8 जिल्ह्यांतून 289 मृतदेह बाहेर काढले

नेपाळमधील रसुवाजवळ त्रिशुली नदीला आलेल्या महापुरानंतर, आतापर्यंत 8 जिल्ह्यांतून 289 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही आकडेवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे. चितवनमध्ये सर्वाधिक 121 मृतदेह सापडले आहेत. त्याखालोखाल पूर्व नवलपरासी (65), धादिंग आणि गोरखा (प्रत्येकी 29), तनहुन (16), नुवाकोट (12), पश्चिम नवलपरासी (14) आणि रसुवा (3) यांचा क्रमांक लागतो.

भारत नेपाळला बेली ब्रिज पाठवणार

पुरामुळे खराब झालेले रस्ते आणि पूल दुरुस्त करण्यासाठी भारत नेपाळला बेली ब्रिज पाठवणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा एक पोर्टेबल आणि पूर्वनिर्मित पूल आहे, जो आवश्यक ठिकाणी त्वरित उभारला जाऊ शकतो. जेव्हा पूर किंवा भूस्खलनामुळे पूल उद्ध्वस्त होतो, तेव्हा बेली ब्रिज रस्त्यांची जोडणी त्वरित पूर्ववत करण्यास मदत करतो. गरजेनुसार तो हलवून पुन्हा स्थापितही केला जाऊ शकतो.

त्रिशुलीमध्ये हेलिकॉप्टरद्वारे बचाव आणि मदत कार्य सुरूच

पुराच्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या त्रिशुली प्रदेशात मदत आणि बचाव कार्य तीव्र झाले आहे. खराब झालेले रस्ते आणि इतर मार्गांमुळे अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले जात आहे. बचावलेल्या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे त्रिशुली बाजारात नेले जात आहे. लष्करी आणि खाजगी हेलिकॉप्टरच्या मदतीने आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha