Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Netflix Top 10 Trending Series: लाडका नातू सीरियल किलरच्या ताब्यात, आजोबा आणि वडिलांचा मोठा संघर्ष; नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतोय कादंबरीवर बनलेला 'हा' सिनेमा

Netflix Top 10 Trending Series: लाडका नातू सीरियल किलरच्या ताब्यात, आजोबा आणि वडिलांचा मोठा संघर्ष; नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतोय कादंबरीवर बनलेला 'हा' सिनेमा

ABP माझा 1 week ago

Netflix Top 10 Trending Series: जेव्हा जेव्हा एखाद्या 'सीरियल किलर'वर आधारित वेब सीरिज किंवा सिनेमा प्रदर्शित होतो, तेव्हा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर त्याची मोठी चर्चा रंगते. नेटफ्लिक्सच्या 'द व्हिस्पर मॅन' (The Whisper Man) या नव्या क्राईम थ्रिलर सिनेमाच्या बाबतीतही असंच घडलंय.

28 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक स्तरावर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या सिनेमानं त्वरित स्ट्रीमिंग चार्ट्सवर वर्चस्व गाजवलंय. रॉबर्ट डी निरो, ॲडम स्कॉट आणि मिशेल मोनाघन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सच्या 'टॉप 10' यादीत पहिल्या क्रमांकावर आला आणि जागतिक स्तरावर आपलं अव्वल स्थान टिकवून आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाला सध्या IMDb वर 6.3/10 रेटिंग मिळालंय.

हा सिनेमा कोणत्या पुस्तकावर आधारित आहे? (The Whisper Man Film)

'द व्हिस्पर मॅन' सिनेमा ॲलेक्स नॉर्थ यांच्या 2019 मधील 'द व्हिस्पर मॅन' या कादंबरीवर आधारित आहे, जी 'न्यूयॉर्क टाइम्स'ची बेस्टसेलर ठरली होती. या सिनेमाची कथा लेखक टॉम केनेडी (ॲडम स्कॉट) यांच्याभोवती फिरते, ज्यांचा आठ वर्षांचा मुलगा बेपत्ता होतो. ते त्यांचे दुरावलेले वडील आणि निवृत्त डिटेक्टिव्ह पीट विलिस (रॉबर्ट डी निरो) यांची मदत घेतात. त्यानंतर, पीट विलिस आणि डिटेक्टिव्ह अमांडा बेक (मिशेल मोनाघन) बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास सुरुवात करतात. या तपासाचे धागेदोरे 'द व्हिस्पर मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका जुन्या सीरियल किलरच्या प्रकरणाशी जोडले जातात. या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स ॲशक्रॉफ्ट यांनी केलं असून, याची पटकथा बेन जॅकोबी आणि चेस पामर यांनी लिहिली आहे. या सिनेमाचा रनटाइम साधारणपणे 1 तास 51 मिनिटं इतका आहे.

'द व्हिस्पर मॅन'च्या खास गोष्टी (The Whisper Man Film On Netflix)

'द व्हिस्पर मॅन'चे निर्माते 'एजीबीओ' (AGBO) यांनी 2018 मध्येच, म्हणजेच ही कादंबरी प्रकाशित होण्याच्या साधारण वर्षभर आधीच, तिच्या हक्कांची (Rights) खरेदी केली होती. ॲलेक्स नॉर्थ यांच्या कादंबऱ्यांपैकी पडद्यावर रूपांतरित होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमासाठी केलेल्या बदलांशी लेखकाचं पूर्णपणे एकमत होतं अशी माहिती समोर आली आहे. मूळ कादंबरीत मुलाचं अपहरण नंतरच्या टप्प्यावर घडतं, पण सिनेमात ही घटना आधीच्या भागात दाखवण्यात आली आहे, जेणेकरून वडील आणि मुलगा मिळून तपास करू शकतील. या सिनेमाचं बजेट 50 कोटी डॉलर्स (सुमारे 477 कोटी रुपये) इतके आहे.

सिनेमाचं शुटिंग एप्रिल ते जून 2025 या काळात प्लेनफील्ड, न्यू जर्सी आणि आसपासच्या परिसरामध्ये पार पडलं. 1997 मधील 'जॅकी ब्राउन' (Jackie Brown) सिनेमानंतर रॉबर्ट डी निरो आणि मायकल कीटन हे कलाकार पहिल्यांदाच पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर आले आहेत. कीटन यांनी यात 'फ्रँक कार्टर' म्हणजेच 'विस्पर मॅन'ची (Whisper Man) भूमिका साकारली आहे. एकंदरीत, 'द विस्पर मॅन' हा जुन्या शैलीतील क्राईम थ्रिलर सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे.

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha