French Open Novak Djokovic VS Joao Fonseca News : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत एक खूप मोठा आणि धक्कादायक उलटफेर पाहायला मिळाला आहे. 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन आणि जगातील दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याला अवघ्या 19 वर्षांच्या ब्राझीलच्या जोआओ फोन्सेकाने (Joao Fonseca) पराभवाचा धक्का दिला आहे.
सुरुवातीचे दोन सेट जिंकल्यानंतरही जोकोविचला या अटीतटीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. याआधी गुरुवारी हिट वेव्ह आणि चक्कर येण्याच्या त्रासामुळे यानिक सिनर (Jannik Sinner) देखील स्पर्धेतून बाद झाला होता. जोकोविचलाही सामन्यादरम्यान पॅरिसमधील प्रचंड उष्णतेचा त्रास होताना दिसला.
4 तास 53 मिनिटांचा थरार (Novak Djokovic VS Joao Fonseca French Open)
नोव्हाक जोकोविच आपले विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. गुरुवारी सिनरचा पराभव झाल्यानंतर जोकोविचसाठी ही सुवर्णसंधी मानली जात होती. मात्र, पॅरिसमधील कडक उन्हाचा फटका जोकोविचलाही बसला. फिलिप चार्टियर कोर्टवर झालेल्या या सामन्यात फोन्सेकाने जोकोविचचा 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा पराभव केला. तब्बल 4 तास 53 मिनिटे चाललेल्या या सामन्यात फोन्सेकाने आपल्या खेळाने सर्वांनाच थक्क केले.
पॅरिसला मिळणार नवा चॅम्पियन (Joao Fonseca French Open)
आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूकडून जोकोविचचा झालेला हा पराभव टेनिस जगताला चकित करणारा आहे. या पराभवामुळे आता पुढच्या आठवड्यात पॅरिसमध्ये फ्रेंच ओपनला एक नवा ग्रँडस्लॅम चॅम्पियन मिळणार हे निश्चित झाले आहे. ब्राझीलचा उदयोन्मुख टेनिस स्टार जोआओ फोन्सेका हा आगामी पिढीतील एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू मानला जातो.
फोन्सेकाचा फोरहँड ठरला गेमचेंजर (Joao Fonseca French Open News)
या ऐतिहासिक विजयासह फोन्सेकाने 2010 मधील जुर्गन मेल्जरच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. जोकोविचने पहिले दोन सेट जिंकल्यानंतर सामन्यात पुनरागमन करून त्याला हरवणारा फोन्सेका 2010 नंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. फोन्सेकाचे सर्वात मोठे शस्त्र त्याचा 'फोरहँड' शॉट आहे, जो तो पुरुष टेनिस जगतात इतर कोणत्याही खेळाडूच्या तुलनेत अत्यंत ताकदीने मारतो. सुरुवातीला काही चुकांमुळे त्याला लय सापडत नव्हती, पण नंतर त्याने सामन्यावर पकड मिळवली.
तर, जोकोविचच्या कारकिर्दीत ही फक्त दुसरी वेळ आहे, जेव्हा त्याला 5 तासांच्या जवळ चाललेल्या ग्रँडस्लॅम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Author : किरण महानवर

