Pakistan Squad Update 3rd Test vs England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडकडून 194 धावांनी झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा निर्णय घेतला आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान 0-2 ने पिछाडीवर असून, मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीपूर्वी संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पीसीबीने थेट 7 खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक आणि सलमान अली आगा यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. एवढेच नाही तर कसोटी संघाच्या प्रशिक्षण स्टाफमध्येही मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. रेड-बॉलचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर पीसीबीने कठोर निर्णय घेत सात खेळाडूंना संघातून वगळले. मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक आणि माजी व्हाइट-बॉल कर्णधार सलमान अली आगा यांच्यासह अली उस्मान, आमिर जमाल, मोहम्मद अवैस जफर आणि खुर्रम शहजाद यांना तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. पीसीबीने आपल्या अधिकृत निवेदनात लॉर्ड्स कसोटीनंतर सात खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी
ज्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यांच्या जागी सात खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये काही अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंनाही मोठी संधी मिळाली आहे. सॅम अयुब, अब्दुल्ला फजल आणि अष्टपैलू अराफत मिन्हास यांना संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर मोहम्मद इम्रान ज्युनियर, साद बेग, मोहम्मद इम्रान आणि रझाउल्लाह या नव्या चेहऱ्यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे.
दोन प्रशिक्षकांचाही पत्ता कट
खेळाडूंच्या बदलाबरोबरच पीसीबीने प्रशिक्षकांवरही कारवाई केली आहे. रेड-बॉलचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्याच्या उर्वरित भागात आता व्हाइट-बॉलचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि गोलंदाजी प्रशिक्षक ॲशले नॉफके हे कसोटी संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानच्या संघाची रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनमध्येही मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अराफत मिन्हास, अझान अवेस, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद इम्रान, मोहम्मद इम्रान ज्युनियर, मोहम्मद गाझी घोरी (यष्टीरक्षक), रझाउल्लाह, साद बेग (यष्टीरक्षक), सॅम अयुब, साजिद खान, सौद शकील, शान मसूद आणि उबेद शाह.
Author : किरण महानवर

