कोल्हापूर ते शिरोळपर्यंत गटारगंगा झालेल्या पंचगंगा नदीत गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावले आहेत.
शिरोळ परिसरातील नदीपात्रात मृत माशांचा खच पडल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
औद्योगिक विषारी सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटून माशांचा श्वास कोंडला आहे.
पंचगंगा ही शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असली, तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांतून रोष व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभाग जागे होणार का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
दोषींवर कठोर कारवाई करून नदी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
परिस्थिती आणखी गंभीर होण्याआधी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
कोल्हापुरात जयंती नाल्याचे मैलामिश्रित पाणी पंचगंगेत मिसळल्याने राजाराम बंधाऱ्यावर कुजलेल्या कचऱ्याचा तुंब लागला आहे.

