Dailyhunt
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने

Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने

ABP माझा 1 week ago

सोलापूर : पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने 4130 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला अंतिम हिरवा कंदील मिळाला.

आषाढी यात्रेनंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असून पुढील 30 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले आहे.

पंढरपूरमध्ये वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने आगामी 50 वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र मंदिर परिसरातील कॉरिडॉरला सुरुवातीपासूनच काहींकडून विरोध होत असून, आता हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Pandharpur Development Project : कॉरिडॉरला विरोध, पुनर्वसनावरून प्रश्नचिन्ह

कॉरिडॉरमुळे अनेक घरे, दुकाने, वाडे आणि मठ बाधित होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने अद्याप संपूर्ण आराखडा स्पष्टपणे मांडलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

काही विरोधकांनी हा प्रकल्प घाईघाईत राबवला जात असल्याची टीका करत सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पंढरपूरची पारंपरिक संस्कृती आणि वारकरी परंपरेला धोका निर्माण होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

Pandharpur Project Rehabilitation : बाधितांकडून अटीवर स्वागत

दुसरीकडे, अनेक व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी योग्य पुनर्वसन आणि मोबदला मिळाल्यास प्रकल्पाचे स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे. घर आणि दुकाने जाणाऱ्या नागरिकांनी सरकारवर विश्वास व्यक्त करत पर्यायी जागा, भूखंड किंवा दुकाने देण्याची मागणी केली आहे. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, योग्य नियोजन आणि पारदर्शक पुनर्वसन प्रक्रिया राबवली तर हा प्रकल्प पंढरपूरच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल.

Pandharpur Development Timeline : 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन ऑगस्टपर्यंत संपादित करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि शहराचा विकास वेगाने होईल, असा सरकारचा दावा आहे.

Pandharpur Project Details : महत्त्वाची कामे आणि खर्च

या 4130 कोटींच्या प्रकल्पात विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे.

  • वारकरी सुविधा - 288.66 कोटी रुपये
  • मंदिर कॉरिडॉर - 579.27 कोटी रुपये
  • नदी घाट विकास व सुशोभीकरण - 443.39 कोटी रुपये
  • नगर प्रदक्षिणा मार्ग - 162.94 कोटी रुपये
  • शहर सुशोभीकरण - 480.50 कोटी रुपये
  • वाहनतळ आणि व्यापारी संकुल - 68.48 कोटी रुपये
  • पूल आणि हेलिपॅड - 127.60 कोटी रुपये
  • पालखीतळ विकास - 100 कोटी रुपये
  • भूसंपादन व पुनर्वसन - 2026.72 कोटी रुपये

Pandharpur Development Impact : पुढील वाटचाल

हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून, यामुळे पंढरपूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र विरोधक आणि बाधित नागरिकांचे समाधान कसे केले जाते, यावर या प्रकल्पाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

Author : सुनील दिवाण, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha