पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad) निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ एका चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काल (बुधवारी, ता २६) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे दोन कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Pimpri Chinchwad) अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले. कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून वैद्यकीय अहवालानंतरच खरा प्रकार समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षीही याच परिसरात अशाच प्रकारे चेंबरमध्ये अडकून दोघांचा जीव गेला असताना, पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.(Pimpri Chinchwad)
Pimpri Chinchwad : गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
चेंबरमध्ये उतरल्यानंतर विषारी वायूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी चेंबरमध्ये नक्की कसले काम सुरू होते आणि कामगारांकडे सुरक्षेची कोणती साधने (Safety Gear) होती, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून दोघांनाही बाहेर काढले, मात्र रूग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
Pimpri Chinchwad : प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप
निगडी प्राधिकरणात गेल्या वर्षीही अशाच प्रकारे चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी अंत झाला होता. एवढी मोठी दुर्घटना घडूनही महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
Pimpri Chinchwad : पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू
दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत कामगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला जात आहे. सर्व बाजूंचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. वैद्यकीय अहवाल (Post-Mortem Report) आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
Author : नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड

