PM Modi Gold buying and Foreign tour: भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत 7.8 टक्के इतका विकास दर नोंदवल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी देशवासियांना एक महत्त्वाचे आवाहन केले. देशाचा आर्थिक विकासदर सध्या चांगला आहे. ही गती कायम ठेवायची असेल तर आपल्याला स्वदेशी (Swadeshi) आणि आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) या दोन धोरणांचा अधिकाअधिक अवलंब करावा लागेल. त्यासाठी परदेशातील प्रवास टाळा. विदेशात जाऊन लग्नसोहळे (Wedding) करणे टाळा, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. तसेच गरज नसेल तर सोनं (Gold) खरेदी करु नका, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारतीय अर्थव्यवस्थेने 7.8 टक्के इतका आर्थिक विकासाचा दर नोंदवला. यासाठी देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण देश आनंदाने भरुन गेला आहे. हे जनतेच्या पुरुषार्थ, संकल्पशक्ती आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे. संपूर्ण जग युद्धात बुडालं आहे. चारही बाजूंनी संकटांच्या बातम्या येत आहेत. जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कोरोनानंतर जगभरात कुठेही स्थिरता नाही. तरीही भारत इतक्या वेगाने प्रगती करत आहे. भारतामधील निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक 'झुठ की गुंज'च्या माध्यमातून चारही दिशांना अपप्रचार करत आहेत. मात्र, या सगळ्याला पार करुन, हे निराशेचे वातावरण भेदून भारतीय अर्थव्यवस्थेने 7.8 टक्के इतका आर्थिक विकासदर नोंदवला. ही गती कायम राखायची असेल तर आपल्याला आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या दोन धोरणांचा आग्रहाने अवलंब करावा लागेल, असे मोदींनी म्हटले.
आपण जितके अधिक स्वदेशी गोष्टी वापरु आणि आत्मनिर्भर होऊ, तेवढी 2047 मध्ये चांगल्या भारताची निर्मिती होईल. त्यासाठी आपल्या पुरुषार्थात कोणतीही कमी राहायला नको. आपली निती आणि नियत साफ आहे. 140 कोटी जनतेची ही शक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. याचा आनंद साजरा करा, त्यासोबत संकल्पही करा. हा संकल्प सिद्धील नेण्यासोबत माझ्यासोबत चला, अशी भावनिक सादही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी घातली.
GDP India: भारताचा GDP दर 7.8 टक्क्यांवर
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे खनिज तेलाचे दर भडकल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत सापडली होती. मात्र, या सगळ्या आव्हानांवर मात करत पहिल्या भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली. गेल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाचं ढोबळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वृद्धीदर 7.8 टक्के राहिला आहे.
Author : रोहित धामणस्कर

