Prathamesh Parab On Samir Choughule: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) टेलिव्हिजनवरचा (Television Show) अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सध्या घराघरांत पोहोचला आहे.
या कार्यक्रमाला आणि त्यात झळकणाऱ्या कलाकारांना अल्पावधीतच मोठी पसंती मिळालीय. कित्येकजण या कलाकारांचे स्किट्स पाहून पोट धरुन हसतात आणि आपल्या आयुष्यातली दुःख विसरतात. या कार्यक्रमातील असाच एक कलाकार म्हणजे, समीर चौघुले. अल्पावधीतच आपल्या अभिनयानं आणि कॉमिक टायमिंगनं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. तसेच, समीर चौघुले त्यांचा एक कार्यक्रमही घेतात. त्या कार्यक्रमाचं नाव, 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या...'. समीर चौघुलेंच्या या कार्यक्रमाला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. असाच एक समीर चौघुलेंचा फॅन आणि मराठीतला प्रसिद्ध अभिनेत्यानं नुकतीच समीर चौघुलेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. त्यानंतर त्यानं पोस्ट करत समीर चौघुलेंचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
'टाईमपास' फेम मराठी अभिनेता प्रथमेश परब यानं नुकतीच समीर चौघुले यांच्या 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या...' या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. या कार्यक्रमानंतर प्रथमेश परबनं समीर चौघुलेंचं कौतुक करणारी एक पोस्ट केलीय. ही पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे.
अभिनेता प्रथमेश परबनं काय पोस्ट केलीय? (Prathamesh Parab Comment On Samir Choughule)
अभिनेता प्रथमेश परब म्हणाला की, "इतके हसलोय अरे, पण खरं सांगू, हा अडीच तासांचा परफॉर्मन्स बघताना हसण्यापेक्षा अभिमानानं रडायला जास्त येत होतं. समीरदादाबरोबर माझं एक वेगळंच कनेक्शन आहे. आम्ही डहाणूकर कॉलेजला जायचो, तेव्हा आमचे शिक्षक नेहमी सांगायचे की, समीर चौघुले, पुष्कर श्रोत्र, अनिकेत विश्वासराव हे डहाणूकरचे स्टार आहेत. जबरदस्त काम करायचे. अनेकदा त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा हा पुरस्कार मिळलाय..."
"तेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल ऐकायचो, त्यांचं काम बघायचो आणि नंतर मला समीरदादाबरोबर 'बिनधास्त पाहा' हे नाटक करायला मिळालं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यातला तो काठीचा सीन, आम्ही तो प्रेक्षकांमध्ये बसून नाही, तर विंगमध्ये उभं राहून बघायचो. समीरदादा तो सीन परफॉर्म करायचा आणि आम्ही बाजूला उभं राहून अक्षरशः त्याचा आनंद घ्यायचो आणि त्याच वेळी खूप काही शिकायचो. आज इतक्या वर्षांनी 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' हा अडीच तासांचा परफॉर्मन्स बघताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर आल्या...", असं अभिनेता प्रथमेश परब म्हणालाय.
त्यांचं काम बघताना फक्त हसू येत नाही, तर एका कलाकारानं स्वतःला इतकी वर्ष घडवत नेलंय, याचा अभिमानही वाटतो : प्रथमेश परब
प्रथमेश परबनं पुढे लिहिलंय की, "गेली 25-30 वर्ष हा माणूस विनोद निर्माण करतोय, लिहितोय, परफॉर्म करतोय आणि त्या सगळ्या वर्षांची मेहनत आज त्यांच्या सहजतेत, दिसते. त्यांचं काम बघताना फक्त हसू येत नाही, तर एका कलाकारानं स्वतःला इतकी वर्ष घडवत नेलंय, याचा अभिमानही वाटतो. आपण जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा काही नावं आपल्या डोळ्यांसमोर असतात. आपण त्यांच्याबरोबर काम केलेलं नसतं; पण त्यांचा प्रवास कुठेतरी आपल्याला प्रेरित करीत असतो. समीरदादा माझ्यासाठी त्यातलं एक नाव आहे..."
"सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, तो आपल्या डहाणूकरचा आहे. काल प्रेक्षक म्हणून खूप हसलो; पण आतून एकच भावना होती की, हा आपला माणूस आहे आणि किती भारी काम करतोय. समीरदादा, खूप प्रेम, खूप आदर आणि खूप अभिमान. असंच काम करीत राहा आणि आम्हाला प्रेरित करत राहा. डहाणूकरचा आमचा सुपरस्टार आहे. फोटो काढताना सगळे त्याला म्हणत होते की, तू सेंटरला उभा राहा; पण दादाला मात्र माझ्याच बाजूला उभं राहायचं होतं. खूप प्रेम", असं म्हणत प्रथमेश परब यानं समीर चौघुलेंबाबत प्रेम आणि आदर व्यक्त केलाय.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

