Dailyhunt
Pune Crime News: पुण्यात महिला प्राचार्याकडून 7 लाखांची खंडणी उकळली; 'रील स्टार' महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ!

Pune Crime News: पुण्यात महिला प्राचार्याकडून 7 लाखांची खंडणी उकळली; 'रील स्टार' महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ!

ABP माझा 5 days ago

Pune Crime News: गुन्हेगारांवर वचक बसवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांनीच चक्क खंडणीखोरीचा मार्ग पत्करल्याने पुणे पोलीस (Pune Police) दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही मोठी कारवाई केली आहे.

अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे सध्या सायबर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. तर सोनाली हिंगे या पोलीस दामिनी मार्शल असून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्या प्रसिद्ध रील स्टार देखील आहेत. तसेच सुदाम तायडे यांची शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली आहे.

Pune Crime News: नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला या तिघांनी संगनमताने जाळ्यात ओढले. तुमच्यावर 'पॉक्सो' (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल, अशी भीती या पोलिसांनी दाखवली. पोलीस असल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची प्रचंड दहशत निर्माण केली आणि प्रकरण मिटवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली. अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीने पीडित प्राचार्यांनी ही रक्कम या पोलिसांना दिली. मात्र, हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

Pune Crime News: पोलीस आयुक्तांची 'मोठी कारवाई'

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही तक्रार प्राप्त होताच, त्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत पोलिसांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामध्ये विशेषतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली आणि सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून प्रसिद्ध असलेली महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिचा समावेश असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Pune Police: पोलीस दलात खळबळ

सामान्य जनतेचे रक्षण करण्यासाठी नेमलेले पोलीसच जेव्हा वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळतात, तेव्हा खाकीवरील विश्वास डळमळीत होतो. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, दोषी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?

Author : शिवानी पांढरे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha