Pune Liquor Poisoning Case: पुण्यातील विषारी दारुकांड प्रकरणात (Pune Liquor Poisoning Case) आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विषारी दारु पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
पुण्यातील उरळी कांचनमधील 32 वर्षीय उमेश अवचर याचा विषारी दारु पिल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उमेश अवचर हा रिक्षा चालक उरळी कांचनमधील एका खाजगी रुग्णालयात आज त्याचा मृत्यू झाला.
उमेश अवचरच्या मृत्यूआधी काय घडलं? (Pune Liquor Poisoning Case)
उमेश अवचरच्या मृत्यूआधी त्याची दृष्टी अधू बनली होती. त्याचबरोबर मळमळणं आणि हायपर टेन्शनचा त्रास होऊन तोंडातून फेस येऊन उमेश अवचरचा मृत्यू झाला. मृत्यूच्याआधी दोन दिवसांपुर्वी उमेश अवचरने दारु प्यायली होती. विशेष म्हणजे राधेश्याम प्रजापतीने उरळी कांचनमधील ज्या परिसरात दारु तयार केली होती. त्याच भागातील दारु गुत्त्यावर उमेश अवचरने दारु प्यायली होती. त्यामुळे विषारी दारुमुळे होणार्या मृत्युचं लोण पिंपिरी - चिंचवड आणि पुणे या दोन शहरांपाठोपाठ उरळी कांचनमधे पोहचल्याचं पहायला मिळतंय.
पुणे विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत एकूण 22 लोकांना निलंबित- (Pune Liquor Poisoning Case)
पुणे विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत एकूण 22 लोकांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे 13 अधिकारी निलंबित करण्यात आले. पुणे पोलीस - हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले , एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित केले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस - दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाचे इंचार्ज आणि 4 कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय? (Pune Liquor Poisoning Case)
पुणे विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत एकूण 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याची समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. गावातील आझाद चौकातील शोककुळाच्या फलकावर पाच जणांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर ही घटना समोर आली. परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याने, या नागरिकांचा मृत्यू दारूमुळेच झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. बंदी असलेली हातभट्टीची गावठी ( विषारी ) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापले असून, अशा अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Pune Pimpri Liquor Poisoning)
सदर प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक, चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, VIDEO:
Author : मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

