Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune News: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई,  दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune News: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

ABP माझा 1 week ago

पुणे : राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत, तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि एफडीएच्या पथकाने संयुक्तपणे ही मोठी (Pune News) कारवाई केली आहे.

पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडीत विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. 13 जणांना बेड्या ही ठोकण्यात आल्यात. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून डेअरीत येणाऱ्या दूध मध्ये भेसळ केली जात होती. 500 लीटर दुधात तब्बल 300 लीटर, तसेच 1000 लीटर दुधात 500 लीटर असं भेसळीचं प्रमाण होतं.(Pune News)

वास न येणारा शाम्पू, दुधाची पावडर आणि केमिकल पाण्यात मिसळून ही भेसळ केली जात होती. त्यानंतर हे भेसळीचं दूध नामांकित कंपन्यांमध्ये पुरवलं जायचं. पुढं यापासून दुग्धजन्य (Pune News) पदार्थ बनवले जायचे, घरोघरी येणाऱ्या पिशव्यांमध्ये ही हेचं दूध यायचं. गेल्या दोन वर्षांपासून सर्व सामान्यांच्या जीवाशी हा खेळ सुरु होता. अशी माहिती आता समोर आलीये. पुण्यातील मंचरमधील दोघांना अटक केल्यानंतर या टोळीचं बिंग फुटलं आणि मग राज्यातील विविध जिल्ह्यात पुणे ग्रामीण आणि एफडीएने छापे टाकत त्यांचा पर्दाफाश केला. पुणे ग्रामीण पोलिसांचे 25 तसेचं एफडीएच्या 20 जणांच्या पथकाने ही कारवाई केली. सर्व सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या टोळीत आणखी अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरुये.(Pune News)

Pune News: 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई

पुण्यातील खवय्यांसाठी आणि हॉटेल चालकांसाठी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) पुणे शहरातील हॉटेल्सवर मोठी कारवाई करत प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज' (Mathura Pure Veg) हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येईपर्यंत हे हॉटेल बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच पुण्यातील तब्बल 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कडक निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात हॉटेल चालकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 3 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यातील तब्बल 70 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची (Hotels and Restaurants) अचानक तपासणी करण्यात आली. पुण्यातील ज्या 7 रेस्टॉरंट्सवर एफडीएने धाडी टाकल्या, तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणी दरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज'वर झालेली कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एफडीएच्या पथकाने या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. हा चाचणी अहवाल जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आगामी काळातही पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही तपासणी मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Author : नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha