Pune Santosh Pandit Arrest: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर टीका करणारा मजकूर आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणारे यू-ट्यूबर संतोष पंडित (Santosh Pandit) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी रात्री एक वाजता कोथरुड पोलिसांनी संतोष पंडित यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, संतोष पंडित यांनी कोथरुडमधील (Kothrud news) विकासकामांबाबत यू ट्यूबवरील व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण करताना अश्लील शेरेबाजी केली होती. त्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात संतोष पंडीत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे संतोष पंडीत यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर काल रात्री एक वाजता कोथरुड पोलिसांचे पथक संतोष पंडीत रहात असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना अटक करण्यात आली. मात्र, यावेळी रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. (Pune Crime news)
संतोष पंडित यांना अटक करण्यासाठी कोथरुड पोलीस दोन पांढऱ्या गाड्या घेऊन आले होते. काही पोलीस कर्मचारी हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. पोलिसांनी संतोष पंडित यांनी अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडीओ शुटिंग सुरु केले. पोलीस संतोष पंडित यांना गाडीत बसवत असताना त्यांनी या सगळ्या प्रकाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पोलीस रात्री साडेबारा एक वाजता आमच्या घरात घुसतात. आमच्यासारख्यांची तीच लायकी आहे, असे संतोष पंडित म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी एका खाकी वर्दीतील पोलीस अधिकाऱ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल, सहकार्य करत नसेल असं वाटत असेल तर माफी मागतो. अटक केल्याबद्दल धन्यवाद, असे संतोष पंडित यांनी म्हटले. यानंतर संतोष पंडित यांनी पोलिसांना थांबवत आपला मोबाईल आणि गाडीची किल्ली, कमरेचा पट्टा काढून आपल्या कुटुंबीयांना दिला. पोलिसांना कोणत्या गोष्टींची गरज नाही, हे मला माहिती आहे, असे त्यांनी म्हटले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Santosh Pandit news: संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल का झाला?
संतोष पंडित हे सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत, त्यामधील असणाऱ्या त्रुटींबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी पंडित यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ मजकूर असलेली व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती. मंत्र्यांची जाहीर बदनामी केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांना बगल देतात, अशा आशयाचा दावा करत या व्हिडिओमध्ये मंत्र्यांवर थेट टीका करण्यात आली होती. मात्र, केवळ टीका न करता त्यात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व असभ्य भाषेचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
Author : मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

