Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे विमानतळावर प्रवाशांची लूट, राजू शेट्टींनी टॅक्सी प्रवास भाड्याची पावतीच टाकली, कॅबचालकांच दु:खही मांडलं

पुणे विमानतळावर प्रवाशांची लूट, राजू शेट्टींनी टॅक्सी प्रवास भाड्याची पावतीच टाकली, कॅबचालकांच दु:खही मांडलं

ABP माझा 2 months ago

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांची, प्रवाशांची या ना त्या कारणाने कुठे ना कुठे लूट केली जाते. अनकेदा पर्यटनाला गेल्यानंतर टॅक्सी (Taxi), रिक्षाचालक यांच्याकडूनही लूट होत असल्याच्या अनेकदा तक्रारी समोर येतात.

मात्र, आता चक्क पुणे (pune) विमानतळावरुनच प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचे माजी खासदार तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी (Raju shetti) म्हटलं आहे. पुणे विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांची लुबाडणूक करण्यात येत आहे, असे म्हणत राजू शेट्टींनी मध्यरात्री 2 वाजता त्यांच्यासमवेत घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी, त्यांना आकारण्यात आलेल्या टॅक्सी भाड्याचा फोटोही त्यांनी शेअर केलाय.

पुण्यातील संत तुकाराम महाराज लोहगांव विमानतळावरून दररोज जवळपास 30 हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. पुणे येथील विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना ओला , उबेर यासह टॅक्सी संघटनांच्या गाड्या विमानतळावर पिक अप करण्यासाठी आल्यास प्रत्येक वाहनधारकाकडून जवळपास 200 ते 300 रूपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे. काल रात्री मी 2 वाजता दिल्ली येथून पुणे विमानतळावर आल्यानंतर टॅक्सी बुकींग केल्यानंतर हा प्रकार मला निदर्शनास आला. पुणे विमानतळ ते शासकीय विश्रामग्रह हे अंतर ॲानलाईन केल्यानंतर 350 ते 375 रूपये दाखवित होते. मात्र, जर ओला, उबेर किंवा अन्य टॅक्सी संघटनांची वाहने विमानतळाच्या गेटवरून पिक अप करायचे असल्यास 650 रूपये इतकी रक्कम आकारण्यात आली. याबाबत मी विमानतळावर माहिती घेतली असता ओला, उबेर किंवा अन्य टॅक्सीधारक जर विमानतळावरील गेटवर प्रवाशांना पिक अप केल्यास शुल्क आकारणी करण्यात येते आणि हा शुल्क नको असेल व कमी दरात प्रवास करायचा असेल तर विमानतळाशेजारी असणाऱ्या एरोमॉल वर जावे लागत असून विमानतळ ते एरोमॉल हे जवळपास 600 मीटर आहे, असे म्हणत राजू शेट्टींनी प्रवाशांची व्यथा मांडली.

650 रुपयांपैकी टॅक्सीचालकास केवळ 150

विमानतळ प्राधिकरण यांच्या संगनमताने याठिकाणी मक्तेदारी निर्माण करून प्रवाशांना लुबाडण्याचा धंदा सुरू झाला. मुळातच सर्वच प्रवाशांच्याकडे असलेल्या बॅगा व साहित्य यामुळे 600 मीटर चालणे शक्य नाही हे स्पष्ट होते. याकरिता प्राधिकरणाने अशा पध्दतीने प्रवाशांना जादा शुल्क लावून सर्रास लुट करत आहेत. काल मी ज्या टॅक्सीने प्रवास केला त्या टॅक्सीचालकाच्या एकूण 650 रुपये भाड्यापैकी मुळ 375 रुपये त्यांचे कंपनी भाडे झाले व 275 रूपये टर्मिनल प्राधिकरण भाडे झाले. त्याबरोबरच टॅक्सी चालकांच्या 375 रूपयामधील 25 ते 30 टक्के म्हणजे 100 ते 125 रूपये ओला, उबेर किंवा अन्य कंपन्या कपात करून घेतात. वरील भाड्यापैकी 250 ते 275 रूपये संबंधित टॅक्सी मालकास मिळतात. त्यापैकी 80 ते 100 रूपये पेट्रोल किंवा डिझेलचा खर्च होतो. त्यानंतर राहिलेल्या 150 ते 175 रूपयात गाडीचा मेंटनन्स, हप्ता, कर्जाचे व्याज, त्याचा पगार या सर्वांचा विचार केल्यास रात्रं अन दिवस मेहनत करून हा व्यवसाय कसा परवडत असेल हा विचार मनामध्ये आला, असे म्हणत राजू शेट्टींनी टॅक्सीचालकांची देखील व्यथा मांडली आहे.

दिवसाला 15 लाख रुपयांचा दरोडा

एकीकडे विमानतळ प्राधिकरण एका प्रवाशांच्या पाठीमागे 275 रूपये टर्मिनल भाडे मिळवते, ओला, उबेर यासारख्या कंपन्या एका प्रवाशा मागे 25 ते 30 टक्के कमिशन घेतात आणि दुसरीकडे वाहतूकदार मात्र उपेक्षितच राहतो. राज्यात अशा पध्दतीने खासगी कंत्राटी देवून जनतेची, प्रवाशी व टॅक्सी मालकांची दररोज लाखो रुपयांची राजरोसपणे लुबाडणूक केली जात आहे. पुणे विमानतळावर दररोज सरासरी 5 ते 7 हजार वाहनामधून प्रवाशांना विमानतळ गेटवरून पिकअप केले जाते म्हणजे दररोज 12 ते 15 लाख रुपयांचा दरोडा प्रवाशांच्या खिशावर टाकला जात आहे. मी दिवसभर घेतलेल्या माहितीवरून या सर्व कंत्राटात राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून अनेक मंत्री , लोक प्रतिनिधी व अधिकारी यांचे हप्ते चालू असून अशा पध्दतीने जनतेची सरार्स लुट सुरू झाली आहे. वाहतूक व्यवसाय करणारेही या सर्व जाचाला व व्यवस्थेला कंटाळले आहेत. देशाचे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मतदारसंघातील विमानतळावरच ही परिस्थिती असेल तर देशभरात काय परिस्थिती असणार आहे हे जाणून घेतले पाहिजे. पुणे विमानतळास संत तुकाराम महाराजांचे नाव देवून विमानतळाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारून स्वतःला राज्यकर्ते म्हणून मिरविणारे हे आताच्या युगातील ठग आणि पेंढारी जनतेवर दिवसाढवळ्या सर्रास दरोडा टाकत आहेत, अशा शब्दात राजू शेट्टींनी विमानतळ प्राधिकरणाचं पितळ उघडं केलंय.

हेही वाचा

धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक

Author : महेश गलांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha