Dailyhunt
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?

राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?

ABP माझा 6 days ago

हिल्यानगर : राज्यातील दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Byelection) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण याची उत्सुकता शेवटच्या क्षणी लक्षवेधी ठरत आहेत.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यासाठी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे (Mahayuti) प्रमुख नेते म्हणून उपस्थिती आहे. तर, दुसरीकडे राहुरी (Rahuri) मतदारसंघात भाजपने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यातच, शिंदेंच्या शिवसेनेतून येथे बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी मतदारसंघातला आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी शेतकऱ्यांनीच मला उमेदवारीसाठी आग्रह धरला म्हणून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे मोरे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासंदर्भात बोलताना म्हटले. तर, युती धर्माबाबत त्यांना विचारले असता, शहरात झालेल्या राहुरी नगरपरिषद आणि कारखान्याच्या निवडणूकीवेळी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून विचारात घेतलं जात नाही, आम्ही देखील त्यांचा का विचार करावा? असं उत्तर रवी मोरे यांनी दिलं. त्यामुळे, बारामतीत जरी महायुतीतून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नसला, तरी राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेकडून बंडखोरी झाल्याचं दिसून येत आहे.

प्राजक्त तनपुरेंची मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा

राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी प्राजक्त तनपुरे यांचं नाव आघाडीवर होतं. तर, ठाकरेंच्या शिवसेनेनंही उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, ऐनवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील सोमवारी सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिल्याचे समजते. त्यामुळे, आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.

राहुरीत राष्ट्रवादीकडून दोघांना फॉर्म

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुरी विधानसभा निवडणुकांसाठी 2 एबी फॉर्म पाठविण्यात आले. त्यामध्ये, प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. प्राजक्त तनपूरे यांनी उमेदवारी न घेतल्यास पक्षाचा एबी फॉर्म गोविंदराव मोकाटे यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे, लवकरच पक्षाकडून अधिकृत उमदेवाराचे नाव घोषित होईल आणि तोच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. त्यामुळे, राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

हेही वाचा

राहुरीत भाजपने शेवटच्या क्षणी डाव टाकलाच, विखे-पाटील, चव्हाणांची तनपुरेंशी चर्चा, थेट फडणवीसांनाच फोन लावून दिला अन्...

Author : सुनील भोंगळ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha