नवी दिल्ली : चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण यांच्या ऑईल पेंटिंगचा लिलाव आज करण्यात आला. भारतीय चित्रांच्या लिलावाच्या इतिहासात नवी नोंद झाली आहे. राजा रवि वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण या पेंटिंगसाठी आज बोली लावण्यात आली.
या पेंटिंगची विक्री करण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. या पेंटिंगची विक्री 167.2 कोटी रुपयांना करण्यात आली.
मुंबईत बुधवारी सॅफरॉनआर्टस स्प्रिंग लाईव्ह ऑक्शन पार पडला. यावेळी या पेंटिंगसाठी मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली. अखेर सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अब्जाधीश सायरस पुनावाला यांना हे पेंटिंग 167.2 कोटी रुपयांना खरेदी केलं.
भारतात यापूर्वी एमएफ हुसेन यांच्या पेंटिंगची विक्री 118 कोटी रुपयांना झाली होती. ते पेंटिंग अनटायटल्ड (ग्रामयात्रा) हे होतं. दिल्लीतील किरण नादर यांनी त्याची खरेदी केली होती.
पीटीआयच्या वृत्तानुसार राजा रवि वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण पेंटिंगची किंमत 80 कोटी ते 120 कोटींदरम्यान अपेक्षित ठेवण्यात आली होती. मात्र, लिलाव संपताना पेंटिंगची विक्री दुप्पट किमतीला झाला. या लिलावानंतर पुनावाला यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना म्हटलं की या पेंटिंगची खरेदी करणं त्यांचं कर्तव्य होतं आणि सन्मानजनक देखील आहे. हा राष्ट्रीय खजिना असून जनतेला पाहण्यासाठी पंधरा दिवसात उपलब्ध करुन दिलं जाईल, असं ते म्हणाले.
राजा रवि वर्मा यांनी यशोदा आणि कृष्ण पेंटिंगची निर्मिती 1890 मध्ये केली होती. यशोदा आणि कृष्ण पेंटिंग हे त्यांच्या चित्रकलेतील महत्त्वाचं काम मानलं जातं. या चित्रात यशोदा गाईचं दूध काढत असून त्यांच्या बाजूला बालकृष्ण उभे राहिलेले दिसतात.
राजा रवि वर्मा कोण होते?
राजा रवि वर्मा यांचा जन्म 1848 मध्ये केरळमधील त्रावणकोरमधील कलिमनूर येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला. राजा रवि वर्मा यांना भारतीय आधुनिक कलेचे शिल्पकार देखील म्हटलं जातं. वर्मा यांनी भारतात ऑईल पेंटिंगला लोकप्रिय केलं. भारतीय पुराणातील विषय आणि युरोपियन अकॅडमिक वास्तववादाची चित्रांच्या माध्यमातून सांगड घातली.
राजा रवि वर्मा यांनी 1894 मध्ये एका प्रेसची स्थापना केली होती. ज्यामुळं हिंदू देवदेवतांची चित्र देशभरातील घराघरात पोहोचली. ब्रिटिश गव्हर्नर जनरलनं त्यांना राजा ही पदवी दिली होती.

Author : जगदीश ढोले

