Amravati : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 ते 45 अंशाच्या पुढे गेला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात गारपीट झाली आहे.
अनेक गावात गारपीट झाल्याने संत्रा पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उन्हापासून काही काळ वरुड तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, संत्रा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आज दुपारी वरुड तालुक्यात अनेक गावात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली यावेळी गारपीट झाल्याने संत्रा, मोसंबी फळांचे नुकसान सुद्धा झाले. अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळालं. या अवकाळी पावसाची शेती पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला या पावसामुळं वाढत जाणारा तापमानाचा पारा कमी झाला आहे. हवेत गारवा आल्यामुळं काही प्रमाणात उकाडा कमी झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळी पिकांचे मोठे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः वसमत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेल्या केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वसमत तालुक्यातील बागल पार्डी, सोमठाणा, गिरगाव दाभाडी, पेडगाव आणि सालापूर या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची झाडे वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली असून काही ठिकाणी संपूर्ण बागाच उद्ध्वस्त झाली आहे. केळीची लागवड केल्यानंतर जवळपास वर्षभर मोठ्या मेहनतीने आणि लाखो रुपयांचा खर्च करून शेतकरी बागांची जोपासना करतात. मात्र उत्पादन हाती येण्याच्या अंतिम टप्प्यातच अवकाळी पावसाने घात केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही क्षणातच उभ्या केळीच्या बागा कोसळल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
संपूर्ण देशात यंदा मान्सूनच्या काळात एल निनोचा प्रभाव
संपूर्ण देशात यंदा मान्सूनच्या काळात एल निनोचा प्रभाव असल्याने देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहील, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवले आहे. शुक्रवारी भारतीय हवामान खात्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला. यापूर्वी एप्रिल महिन्यात हवामान खात्याने संपूर्ण देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता यामध्ये सुधारणा करुन हवामान खात्याने देशात 90 टक्के पावसाचा (Monsoon) अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील पर्जन्य स्थितीविषयी काही निरीक्षणे नोंदवली आहेत.
भारतीय हवामान खात्याने यापूर्वी दिलेल्या आपल्या पावसाच्या अंदाज घट केली आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहील. यंदाच्या मान्सूवर एल निनोचे सावट आहे. जून महिन्यात हा प्रभाव फार नसेल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एल निनोचा प्रभाव सर्वसाधारण आणि सप्टेंबर महिन्यात तो सर्वाधिक असेल. याचा विपरीत परिणाम मान्सूनसवर होईल, असे के.एस. होसाळीकर यांनी सांगितले.
Author : प्रणय निर्बाण, एबीपी माझा

