रायगड: राज्यातील विधानपरिषद निवडणुकांचे (Election) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. मात्र, अद्यापही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीत शिवसेना शिंदे गटाने रायगडची (Raigad) जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केल्याची माहिती आहे.
त्या बदल्यात शिवसेनेला (Shivsena) राष्ट्रवादीने परभणी हिंगोलीची जागा दिल्याचेही समजते. मात्र, रायगडची जागा काही केल्या तटकरेंना जाऊ न देण्याचा प्रयत्न शिंदेंच्या आमदारांचा असल्याचं दिसून येते. येथील मंत्री भरत गोगावले यांनी सामंजस्य भूमिका घेतली असली तरी रायगडमधील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने आज विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत पुन्हा तणाव होण्याची चिन्हे आहेत.
आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत, त्यांनी कायम आमच्यावर अन्याय केला आहे. एकनाथ शिंदे काय बोलतात? याबाबत विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जुईली दळवी यांनी दिली. तर, दळवी यांच्या मुलीने नेमका कशासाठी फॉर्म भरला याबाबत महेंद्र दळवी यांच्याशी मी चर्चा करेन. तसेच, ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील, असे मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, रायगडच्या विधानपरिषद जागेवरुन शिवसेना-महायुतीत आलबेल नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.
रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळणार
कोकणातील विधानपरिषदेच्या एकमेव जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रणकंदन सुरू असताना मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री आणि अनिकेत तटकरे यांना विधानपरिषद देण्याच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत मंत्री भरत गोगावले हे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांनाच मिळणार आहे, त्यामुळे कोणाशी तह करण्याचा सवालच येत नाही, असे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरे यांच्याशी आमचा तह होऊच शकत नाही, कारण त्यांचं आणि कुटुंबाचं राजकीय अस्तित्व आता संपलेले आहे. त्यांना राजकारणात पुन्हा जीवनमान देणे हे कदापि शक्य नाही, असेही महेंद्र दळवींनी म्हटलंय.
सातारा-सांगलीतून अर्ज दाखल
सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. आटपाडीमधील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होऊ अर्ज दाखल केला.
अमरावतीत काँग्रेसचा उमेदवारी अर्ज दाखल
अमरावती विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज हर्षजीत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हर्षजित देशमुखांच्या अर्ज भरण्याला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी 'दांडी' मारल्याने विविध चर्चा होत आहे. दरम्यान, भाजपमधील अंतर्गत कल ह्याचा आम्हाला फायदा होईल, असे हर्षजीत देशमुख यांनी म्हटलं.
हेही वाचा
Author : स्वप्नील घाग

