Dailyhunt
RCB vs CSK IPL 2026 : आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! थालाविना चेन्नई अनाथ, सलग 3 पराभवांचा कलंक, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं?

RCB vs CSK IPL 2026 : आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! थालाविना चेन्नई अनाथ, सलग 3 पराभवांचा कलंक, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं?

ABP माझा 2 weeks ago

RCB beat CSK IPL 2026 Marathi News : आयपीएल 2026 च्या 11 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 43 धावांनी धुव्वा उडवला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला.

टीम डेव्हिडच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 250 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांसारखे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! (IPL 2026 Points Table)

या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. दोन सामन्यांत दोन विजय आणि 4 गुणांसह उत्कृष्ट नेट रनरेटमुळे बंगळुरू संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, एमएस धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची अवस्था खराब झाली असून, त्यांना स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तळाशी आहे.

टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, रजत पाटीदारचाही तांडव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 251 धावांचा डोंगर उभा केला. सुरुवात थोडी सावध झाली असली तरी मधल्या आणि शेवटच्या षटकांत आरसीबीच्या फलंदाजांनी गिअर बदलत चेन्नईच्या गोलंदाजी धुलाई केली. विराट कोहलीने सर्वात कमी 18 चेंडूत 28 धावा केल्या. फिल साल्टने 30 चेंडूत 46 धावांची झंझावाती खेळी केली, तर देवदत्त पडिक्कलने 29 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक झळकावलं. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार होते. मात्र खरी वादळी खेळी शेवटच्या काही षटकांत पाहायला मिळाली. टिम डेविडने तर चेन्नईच्या गोलंदाजांची झोप उडवली. त्याने अवघ्या 25 चेंडूत नाबाद 70 धावांची तुफानी खेळी करत 3 चौकार आणि तब्बल 8 षटकार ठोकले. त्याला रजत पाटीदारची चांगली साथ मिळाली. त्याने 19 चेंडूत नाबाद 48 धावा करत 6 षटकार ठोकले.

थालाविना चेन्नई अनाथ

धावांचा पाठलाग करताना चेन्नईची टीम 19.4 षटकांत 207 धावांवर सर्वबाद झाली. संघासाठी सरफराज खानने 25 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांची झंझावाती खेळी केली. मात्र एवढ्या प्रचंड लक्ष्यापुढे त्याची ही खेळी अपुरी ठरली. दरम्यान, आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर जेकब डफी, अभिनंदन सिंग आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तसेच सुयश शर्माने 1 बळी मिळवला.

चुका मान्य करताना ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने पराभवानंतर स्पष्ट कबुली दिली की, 'मी स्वतःही आश्चर्यचकित झालो. सरफराज, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन आणि काही प्रमाणात शिवम दुबे यांनी चांगली झुंज दिली. पण वरच्या फळीमध्ये मी अधिक योगदान दिलं असतं, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.'

क्षेत्ररक्षणातील चुका मान्य करताना गायकवाड म्हणाला, 'जर आपण सुरुवातीलाच विराट कोहलीचा कॅच घेतला असता, तर सामना वेगळ्या दिशेने गेला असता. 13-14 षटकांपर्यंत सामना आमच्या हातात होता, पण त्यानंतरच सामन्याचे चित्र बदलले.'

Tim David RCB vs CSK IPL 2025 : 19 षटकार, 14 चौकार अन् बंगळूरुने रचला नवा इतिहास; टिम डेव्हिडचं वादळ, 25 चेंडूंमध्ये नेमकं काय घडलं?

Author : किरण महानवर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha