Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Red Heat Alert : विदर्भातील 6 जिल्ह्यांना उष्णतेचा 'रेड अलर्ट'; ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांवर! विदर्भात सूर्य ओकतोय आग, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Red Heat Alert : विदर्भातील 6 जिल्ह्यांना उष्णतेचा 'रेड अलर्ट'; ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांवर! विदर्भात सूर्य ओकतोय आग, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

ABP माझा 2 weeks ago

नागपूर : राज्यातील काही भागात उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, हवामान विभागाने विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट (Red Heat Alert) जारी केला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील नागपूर सह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे.

आजसाठी विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज उष्णतेची लाट (Red Heat Alert) राहणार नाही असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.(Red Heat Alert)

Red heat alert : 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट

कालही विदर्भातील या 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता. गेले काही दिवस विदर्भात अतिउच्च तापमानाची नोंद होत आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 46 अंशांच्या घरात नोंदवला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये तर कमाल तापमान 46 ते 47 अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हवामान विभागाने जारी केलेल्या रेड अलर्ट पाहता आजही विदर्भात कमाल तापमान 45 अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.(Red Heat Alert)

Red heat alert : गेल्या दोन दिवसांमध्ये १० जणांचा मृत्यू

सध्या नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. 25 मे पासून सुरू झालेल्या नऊ तपात तर कमाल तापमान 45 अंशांच्या खाली यायला तयार नाही. अशात गेल्या दोन दिवसांमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उष्णतेमुळे उष्माघात होऊन हे मृत्यू झाल्याचा संशय आहे. आरोग्य विभागाने किंवा प्रशासनानं हे मृत्यू उष्माघातानेच झाले असावेत असा दुजोरा दिलेला नाही.

Red heat alert : उष्णतेच्या तीव्र सर्वाधिक फटका भिक्षेकरी आणि बेघरांना

उष्णतेच्या तीव्र सर्वाधिक फटका भिक्षेकरी आणि बेघर असलेल्यांना बसत आहे. रेल्वे स्थानक आणि जवळपासच्या परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला असून उष्माघाताचा संशय आहे. मृतांमध्ये बाहेरगावातून आलेले तीन प्रवासी आणि दोन अज्ञात व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे. रेल्वेतून प्रवास करत नागपुरात पोहोचलेल्या तीनही प्रवाशांची स्थिती प्रवासाच्या दरम्यान खालवली होती. तर शहरातील विविध भागांत आणखी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या 5 जणांचे मृतदेह सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना परिसरात आढळले.

Heat wave: काय करावं ?

• पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
• उन्हात काम करत असल्यास ओल्या कपड्याने डोके मान चेहरा झाकून ठेवा. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळावा.
• टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी व स्थानिक उपलब्ध पाणीदार फळे आणि पाणीदार भाज्या यांचा आहारात समावेश करा.
• घर थंड ठेवण्यासाठी खिडक्यांना पडदे लावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा आणि गारव्यासाठी पंखे किंवा ओल्या कपड्यांचा वापर करा.
• हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
• घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपीचा आणि गॉगल वापर करा.
• ओआरएस (ORS), घरी बनवलेली लस्सी, कोशिंबीर, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी किंवा ताक यांचा नियमित आहारात वापर करा.

Heat wave: काय करू नये ?

• दारू, चहा, कॉफी आणि कार्बनिटेड थंड पेये किंवा जास्त साखर असलेली पेये घेऊ नका, कारण त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
• उन्हात अतिश्रमाची किंवा शारीरिक कष्टाची कामे करणे टाळा.
• उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळा.
• दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडू नका. छतावर जाऊन नका किंवा वरच्या मजल्यावर थांबणे टाळा.
• गडद रंगाचे, घट्ट किंवा जाड कपडे घालणे टाळावे.
• बाहेर जाताना अनवाणी जाऊ नका; नेहमी शूज किंवा चप्पल वापरा.
• उन्हाच्या कालावधीत बंद ठिकाणी स्वयंपाक करणे टाळावे.

अशक्तपणा, डोकेदुखी किंवा सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, व जवळच्या आरोग्यकेंद्रास भेट द्या.

Author : रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha