LSG Rishabh Pant लखनौ : आयपीएलच्या 18 व्या आणि 19 व्या हंगामात लखनौ सुपर जायंटसची कामगिरी समाधानकारक न राहिल्यानं रिषभ पंतनं कर्णधारपद सोडलं. आयपीएलच्या 19 व्या हंगामात लखनौ सुपर जायंटसला दहाव्या स्थानावर राहावं लागलं.
यामुळं रिषभ पंतनं लखनौच्या व्यवस्थापनकाडे कर्णधार पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत लखनौ सुपर जायंटसनं रिषभ पंतला कर्णधार पदावरुन मुक्त केलं. यंदाच्या हंगामात लखनौची कामगिरी खराब राहिली. 14 पैकी केवळ 4 सामन्यात त्यांचा विजय झाला. तर, 10सामन्यात लखनौचा पराभव झाला. आता रिषभ पंत कर्णधार पदावरुन बाजूला झाल्यानं लखनौचा नवा कॅप्टन कोण याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
रिषभ पंतनंतर नवा कर्णधार कोण?
लखनौ सुपर जायंटसनं रिषभ पंतला 27 कोटी रुपये मोजून खरेदी केलं होतं. मात्र, रिषभ पंत दोन्ही हंगामात दबावात दिसून आला. आता त्यानं कर्णधारपद सोडलं असून त्याच्या जागी कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानं लखनौच्या तीन खेळाडूंची नावं कर्णधार म्हणून सुचवली आहेत.
आकाश चोप्रानं व्हिडिओ शेअर करत मिशेल मार्श आणि एडन मार्करम या दोघांना प्रबळ दावेदार मानलं आहे. मिशेल मार्श सध्या ऑस्ट्रेलियाच्या टी 20 टीमचा कर्णधार देखील आहे. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेच्या वनडे टीमचा कर्णधार आहे. चोप्रानं जोश इंग्लिसचं नाव देखील सुचवलं आहे. तो पाकिस्तान विरुद्ध नेतृत्व करणार आहे. तर, एडन मार्करम यानं यापूर्वी सनरायजर्स हैदराबादचं कर्णधारपद भूषवलं होतं. सनरायजर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक राहिली होती. सनरायजर्स हैदराबाद 2023 मध्ये गुणतालिकेत तळाला होती.
रिषभ पंतला लखनौनं ऑक्शनमध्ये 27 कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलं होतं. लखनौनं 2025 च्या हंगामात 14 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले तर 8 सामन्यात पराभव झाला होता. 12 गुणांसह लखनौ त्या हंगामात सातव्या स्थानावर राहिलं होतं. त्यानंतर 2026 च्या हंगामात लखनौची कामगिरी सुधारेल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, या हंगामात लखनौला 14 सामन्यात केवळ 4 सामन्यात विजय मिळवता आला. यामुळं लखनौ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिलं.
कर्णधार म्हणून रिषभ पंत अपयशी ठरला, त्याचप्रमाणं त्याची फलंदाजी देखील निराशाजनक राहिली. या हंगामात रिषभ पंतनं 14 डावांमध्ये 312 धावा केल्या. लखनौनं पहिल्या दोन हंगामात चागंली कामगिरी केली होती. त्यावेळी कर्णधार केएल राहुल होता. गंभीरनं 2024 मध्ये लखनौची साथ सोडल्यानंतर टीमची कामगिरी खराब झाली. लखनौचे संघ मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलला मैदानात दिलेली वागणूक वादाचा विषय ठरली होती. त्यामुळं लखनौमधील खेळाडूंना अधिक स्वातंत्र्य मिळत नसल्याची चर्चा होती.
संजीव गोयंकांनी रिषभ पंतला 27 कोटी रुपये मोजून संघात घेतलं होतं. कोलकाता येथील एका कार्यक्रमात रिषभ पंत 15 वर्षांची गुंतवणूक असल्याचं गोयंकांनी म्हटलं. आयपीएलमधील सर्वात चांगला कर्णधार असं रिषभ पंतला वाटलं होतं. जस्टिन लँगर आणि रिषभ पंत यांच्यात देखील समन्वय दिसून आला नाही.
Author : युवराज जाधव

