Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...

ABP माझा 1 week ago

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 (IPL 2026) च्या एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आपल्या तुफानी फलंदाजीने इतिहास घडवला आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) खेळताना वैभवनं मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत वादळी खेळी केली. त्याच्या या कामगिरीने केवळ चाहत्यांनाच नाही, तर थेट 'क्रिकेटचा देव' (God of Cricket) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) त्याचे कौतुक केले आहे.

Vaibhav Sooryavanshi: 29 चेंडूत 97 धावा; ख्रिस गेलचा विक्रम मोडता मोडता राहिला

हैदराबादने नाणेफेक (Toss) जिंकून आधी क्षेत्ररक्षणाचा (Fielding) निर्णय घेतला. मात्र, सलामीला (Opener) आलेल्या वैभव सूर्यवंशीने हैदराबादच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडवली. वैभवनं अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची तुफानी खेळी केली. या धडाकेबाज खेळीत 5 चौकार (Boundaries) आणि तब्बल 12 गगनचुंबी षटकारांचा (Sixes) समावेश होता. एका क्षणी वैभव ख्रिस गेलचा आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा (Fastest Century) ऐतिहासिक विक्रम मोडीत काढेल असे वाटत होते. मात्र, प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि त्याचे विक्रमी शतक अवघ्या 3 धावांनी हुकले.

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: सचिन तेंडुलकरने केलं तोंडभरून कौतुक

वैभवच्या या खेळीने प्रभावित होऊन मास्टर ब्लास्टर (Master Blaster) सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) पोस्ट करत त्याचे तोंडभरून कौतुक केले. सचिन म्हणाला की, "वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग कमालीचा आहे. त्याहूनही विशेष म्हणजे, लेग साइडला येणाऱ्या चेंडूंवर तो ज्या सुंदर पद्धतीने फ्रंट फुट बाजूला सरकवत स्वतःसाठी जागा निर्माण करतो, ते खरोखर पाहण्यासारखे असते. यामुळे त्याला आपला नैसर्गिक खेळ अधिक मोकळेपणाने खेळता येतो. त्याची ही खेळी खरोखरच थक्क करणारी होती,"

Vaibhav Sooryavanshi: डोक्यावर मानाची 'ऑरेंज कॅप'

या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वैभवनं आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतलं होतं. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी तो ख्रिस गेलचा विक्रम मोडणार भाकीत वर्तवले होते, जे जवळपास खरे ठरले होते. या खेळीसह आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव अव्वल स्थानावर पोहोचला असून 'ऑरेंज कॅप' (Orange Cap) सध्या त्याच्या डोक्यावर आहे. त्याने आतापर्यंत 15 सामन्यांत 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 680 धावा केल्या आहेत.

RR vs GT: राजस्थान 'क्वालिफायर-2' मध्ये

दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या 97 धावा आणि ध्रुव जुरेलच्या 21 चेंडूंतील 50 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 243 धावांचा डोंगर उभारला. 244 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने हा सामना 47 धावांनी जिंकला. या पराभवासह हैदराबादचे आयपीएल 2026 मधील आव्हान संपुष्टात आले आहे, तर राजस्थानने थेट क्वालिफायर-2 (Qualifier 2) मध्ये धडक मारली आहे. शुक्रवारी त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी (Gujarat Titans) होणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील बातम्या; पाहा व्हिडीओ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha