Dailyhunt
Sadabhau Khot on Tukaram Mundhe: 'नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही'; तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Sadabhau Khot on Tukaram Mundhe: 'नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही'; तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

ABP माझा 4 days ago

Sadabhau Khot on Tukaram Mundhe: आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची अवघ्या आठ दिवसांत पुन्हा बदली झाल्याने राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या बदलीचे पडसाद आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर उमटू लागले असून, नांदेड दौऱ्यावर असलेल्या आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुंढेंबाबत केलेल्या एका अजब विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.

तुकाराम मुंढे यांची आठ दिवसांपूर्वीच 'दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिव' पदावरून 'आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन' विभागात बदली करण्यात आली. मागील 21 वर्षांच्या कारकीर्दीत ही त्यांची 25 वी बदली आहे. वारंवार होणाऱ्या या बदल्यांमुळे सोशल मीडियावर सरकारच्या निर्णयावर टीका होत असतानाच, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Sadabhau Khot on Tukaram Mundhe: नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यानिमित्त नांदेडमध्ये असलेल्या सदाभाऊ खोत यांना पत्रकारांनी मुंढेंच्या वारंवार होणाऱ्या बदलीबाबत प्रश्न विचारला. त्यावर खोत यांनी टिप्पणी केली. "माझं घराणं वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे संत तुकाराम महाराजांबाबत मला माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते, पण नवीन युगातील तुकारामांबाबत फारशी माहिती नाही", असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कामाचे कौतुक करण्याऐवजी खोत यांनी 'माहिती नाही' असे म्हणत विषय टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Tukaram Mundhe: दिव्यांग संघटनेचे आंदोलन

तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग विभागात अत्यंत कमी वेळात चांगले काम सुरू केले होते. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग संघटनांनी राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. "मुंढे यांची बदली रद्द न झाल्यास अंदाज समितीच्या आमदारांना घेराव घालू", असा इशाराही यावेळी देण्यात आला. यापूर्वी मंत्रालयातही या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.

Sadabhau Khot: सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला

दरम्यान, विधिमंडळाच्या अंदाज समितीचा नांदेड दौरा सुरू असताना समितीचे सदस्य आमदार सदाभाऊ खोत यांनी आढावा घेतल्यानंतर नांदेड येथील परिवहन विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणीदरम्यान विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर हे कार्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. वेळ देऊनही ते उपस्थित नसल्याने खोत संतापले. त्यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी विभाग नियंत्रकांनी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही खोत यांनी केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली.

Nashik Crime News: AI चा वापर करून 'खाकी'चा बनाव, तोतया पोलीस बनून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन्...; नाशिकमधील चक्रावणारी घटना

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha