Mumbai Mahapalika News : मुंबई महापालिकेतील सर्वसाधारण सभेला दांडी मारणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना आता नोटीस पाठवली जाणार आहे. सर्वसाधारण सभेला दांडी मारणाऱ्या नगरसेवकांवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई पालिकेत सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. सातत्याने सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येवरुन मुख्यमंत्र्यांची नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष बहुमत न मिळाल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्कीची वेळ
मुंबई महापालिकेत आज सकाळी सभेत आलेल्या एका तातडीच्या प्रस्तावावर मंजुरीसाठी 2/3 संख्याबळ लागत होते. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांची अनुपस्थिती असल्याने प्रस्ताव मंजूर झाला नाही. मुंबई महापालिका सभागृहात तातडीचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळं बहुमताअभावी सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आज मांडण्यात आलेला तातडीचा प्रस्ताव अखेर फेटाळण्यात आला. आवश्यक असलेले 3/4 बहुमत मिळू न शकल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.सभागृहात सत्ताधारी गटाचे 61 नगरसेवक उपस्थित होते, तर विरोधकांकडे 58 नगरसेवक होते. मात्र, तातडीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले विशेष बहुमत न मिळाल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्कीची वेळ आली.
हा प्रस्ताव दादर-नायगाव परिसरातील एका भूखंडाच्या पुनर्विकासासंदर्भात होता. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असती, तर त्या भागातील विकासाला गती मिळाली असती. मात्र, बहुमताअभावी प्रस्ताव फेटाळल्याने आता या पुनर्विकास प्रकल्पाचे भवितव्य अनिश्चित झाले असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का, एक तृतीयांश मते विरोधात नोंदवल्याने प्रस्ताव नामंजूर
वडाळा येथील पालिकेचा भूखंड खासगी विकासकाला देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तातडीच्या कामकाजात मतदान घेण्यात आले, यावेळी विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. एक तृतीयांश मते विरोधात नोंदवल्याने प्रस्ताव नामंजूर करण्यात आला, हा सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का मानला जात आहे. वडाळा येथील मोक्याचा भूखंड गोदरेज कंपनीला देण्याचा प्रस्ताव होता. प्रस्तावात तांत्रिक त्रुटी आणि नियमबाह्य पद्धतीचा आरोप काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी केला आहे. विरोधकांनी मतदानाची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. एकतृतीयांश मते विरोधात गेल्याने प्रस्ताव फेटाळण्यात आला. महापालिकेत सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. तर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रस्ताव नियमबाह्य होता असा आरोप यावेळी काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी केला. मुंबईकरांच्या हिताशी तडजोड मान्य केली जाणार नाही. एकतृतीयांश मते देऊन प्रस्ताव रोखला गेला आहे. पुढेही अशा प्रस्तावांना ठाम विरोध करणार असल्याची भूमिका काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी घेतली आहे.
Author : अभिषेक मुठाळ

