सांगली : विधानपरिषदेच्या सातारा सांगली मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडे जाणार असल्याचं चित्र आहे. या मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सातारा आणि सांगलीच्या जागेवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी अशी निवडणूक होण्याची शक्यता असताना शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानं या मतदारसंघात रंगत निर्माण झाली आहे.
तानाजीराव पाटील काय म्हणाले?
सांगली आणि सातारा विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असं तानाजीराव पाटील यांनी म्हटलं. माझे नेते स्वर्गीय अनिल बाबर यांच्यासोबत 30-32 वर्ष राजकारण आणि समाजकारणात काम करतोय. या 32 वर्षाच्या कालावधीत मित्रत्वाच्या नात्यानं सांगली आणि सातारा जिल्ह्यात मित्रांची संख्या आणि जीवाला जीव देणाऱ्यांची संख्या मिळवलीय ती मोठी आहे. सांगली आणि सातारा दोन जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीमुळं पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला. सुहास बाबर, शंभूराज देसाई यांच्यासोबत जाऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे. शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असं तानाजीराव पाटील यांनी म्हटलं.
राजकारणात मी जादा शत्रुत्व कोणासोबत केलेलं नाही, राजकारणात मित्रांची संख्या जास्त आहे. निश्चितपणे सगळ्या पक्षाची लोकं मदत करतील अशी अपेक्षा बाळगत असल्याचं तानाजीराव पाटील म्हणाले. सातारा सांगलीच्या जागेवर सगळेच दावा करतात, आम्ही पण दावा करतोय. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो पुढे चालवू, असं तानाजीराव पाटील म्हणाले. दहा सूचकांच्या मार्फत उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज हा ठेवण्यासाठीच भरला आहे, जुळण्या कशा आहेत त्यावर अर्ज ठेवायचा की नाही हे ठरतं, असं तानाजीराव पाटील म्हणाले.
दोन जिल्ह्यात मित्रांची संख्या अधिक आहे, एकमेकांच्या मदतीला आलेलो आहोत. आमचे नेते सुहास बाबर, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्याकडे सातारा सांगली आपल्यासोबत घ्यावे, असं म्हटल्याचं तानाजीराव पाटील यांनी म्हटलं. सर्व मित्रपक्षांची मदत होईल, असंही तानाजीराव पाटील सांगितलं.
साताऱ्यात शरद पवारांची राष्ट्रवादी- भाजपच्या लढतीची चर्चा
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सातारासांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. महायुतीत ही जागा भाजपकडे जाण्याची चर्चा आहे. या दरम्यान शिवसेनेच्या तानाजीराव पाटी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Author : कुलदीप माने, एबीपी माझा

