मुंबई : भारतीय शेअर बाजारात काल सुरुवातीच्या तेजीनंतर अखेरच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल या निर्देशांकाच्या पुनर्रचनेमुळं भारताचा वाटा कमी झाल्यानं शेअर बाजारात त्याचा परिणाम पाहायला मिळाला.
सेन्सेक्स निर्देशांकात अखेरच्या 10 मिनिटांमध्ये 850 अंकांची घसरण झाली. या घटनाक्रमामुळं शुक्रवारी दिवसभरात गुंतवणूकदारांचं 6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल या निर्देशांकाच्या पुनर्रचनेदरम्यान चार भारतीय स्टॉक्सला काढण्यात आलं त्या ठिकाणी चार भारतीय स्टॉक्सचा समावेश करण्यात आला. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल ग्लोबल स्टँडर्ड निर्देशांकात भारताचा वाटा 12.3 टक्के राहिला आहे. जो फेब्रुवारीमध्ये 12.4 टक्के होता. एमएससीआय ईएम निर्देशांकात भारताचा वाटा 2020 ते 2024 मध्ये 20 टक्क्यांपर्यंत होता. त्यात आता घसरण झाली असून पुढील काळात तो कमी होऊन 11.2 टक्के होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजे पर्यंत सेन्सेक्स 75529.14 अंकांवर ट्रेड करत होता. पुढच्या 10 मिनिटांत त्यामध्ये 850 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 74685 अंकांवर पोहोचला.
मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल म्हणजे काय?
मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल स्टॉक मार्केट निर्देशांक असून 23 देशांमधील 1600 जागतिक स्टॉक्सचा त्यात समावेश आहे. जागतिक गुंतवणूकदारांकडून आंतरराष्ट्रीय निधी वितरणासाठी एमएससीआयचा आधार घेतला जातो. MSCI मध्ये प्रत्येक तिमाहीत फेररचना केली जाते. फेब्रुवारी, मे ,ऑगस्ट आणि नोव्हेंबर या तिमाहींमध्ये फेरबदल केले जातात. याच्या फेररचनेचा परिणाम शेअर बाजारात गुंतवणूक होणे आणि गुंतवणूक बाहेर जाण्यात होतो.
शुक्रवारी नेमकं काय घडलं?
मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल ग्लोबल निर्देशांकात भारतातील फेडरल बँक, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया,नाल्को, इंडियन बँक यांचा समावेश करण्यात आला. तर, ह्युंदाई मोटर इंडिया, ज्युबिलंट फुडवर्क्स, कल्याण ज्वेलर्स आणि रेल विकास निगमला वगळण्यात आलं.
गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं सेन्सेक्स आणि निफ्टी 50 लाल रंगात बंद झाला. सेन्सेक्स 1092 अंकांनी घसरला आणि 74775.74 अंकांवर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 निर्देशांक 24 हजारांच्या पार गेला होता. त्यामध्ये पुन्हा घसरण झाली. निफ्टी 50 निर्देशांक 359 अंकांच्या घसरणीसह 23547.75 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळं बीएसईचं बाजारमूल्य देखील घसरलं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 471 लाख कोटींवरुन घसरुन 465 लाख कोटींवर आले. म्हणजेच शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचं 6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Author : युवराज जाधव

