Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Solapur Ambulance Fire : गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला

Solapur Ambulance Fire : गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला

ABP माझा 4 months ago

Solapur Hospital Incident : सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिकेला (Ambulance) अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली आहे.

सोलापूरमधील श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरात ही घटना घडली असून सुदैवाने रुग्णाला वेळेत उतरवल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

एमएच-13 एसी-0659 (MH-13 AC-0659) या क्रमांकाची चारचाकी व्हॅन स्वरूपातील एक रुग्णवाहिका एका अतिशय गंभीर रुग्णाला घेऊन सायरन वाजवत सोलापूरच्या श्री मार्कंडेय रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने चालकाने विलंब न करता तातडीने रुग्णाला स्ट्रेचरवरून खाली उतरवले आणि उपचारासाठी रुग्णालयाच्या ओपीडी (OPD) विभागात पाठवले. रुग्ण सुखरूप आत गेल्यानंतर चालक ॲम्बुलन्स बाहेर काढत असतानाच अचानक वाहनातून मोठा धूर निघत असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं.

Solapur Ambulance Driver Bravery : चालकाचे प्रसंगावधान आणि धावपळ

वाहनातून अचानक धूर निघत असल्याचा हा प्रकार लक्षात येताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची धावपळ सुरू झाली. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णवाहिकेच्या चालकाने कमालीचे प्रसंगावधान राखलं. त्याने तात्काळ ॲम्बुलन्स रुग्णालय इमारतीजवळून मागे घेतली आणि परिसराबाहेर असलेल्या भिंतीलगतच्या एका मोकळ्या जागेत नेऊन उभी केली. चालक वाहनातून खाली उतरतो न उतरतो तोच काही क्षणांतच चालकाच्या सीटजवळ आगीचा मोठा भडका उडाला.

Fire Brigade Action : आगीवर मिळवले नियंत्रण

रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. आग विझवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. याच दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची (Fire Brigade) गाडीही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग बहुतांशी विझविण्यात यश आलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पुढील अनर्थ रोखला.

Solapur Ambulance Safety : काही मिनिटांचा उशीर ठरला असता घातक

श्री मार्कंडेय रुग्णालयात रुग्णाला सुरक्षितपणे आत दाखल केल्यानंतरच ही आग लागल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर या रुग्णवाहिकेला आग लागण्यात काही मिनिटांचाही उशीर झाला असता, किंवा रुग्ण आत असतानाच रस्त्यात जर ही दुर्घटना घडली असती, तर मोठा अनर्थ ओढवला असता. चालकाच्या समयसूचकतेमुळे रुग्णासह अनेक लोकांचे प्राण वाचले असून सध्या सोलापुरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

Author : आफताब शेख, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha