Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Solapur MLC Election : सोलापुरात काँग्रेसची नामुष्की! सूचकानेच केला 'हाता'चा घात, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद, भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा

Solapur MLC Election : सोलापुरात काँग्रेसची नामुष्की! सूचकानेच केला 'हाता'चा घात, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद, भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा

ABP माझा 1 week ago

Solapur MLC Election Congress Shock : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून (Solapur Vidhan Parishad Constituency) काँग्रेसला मोठा आणि मानहानीकारक धक्का बसला आहे.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर (Aditya Fattepurkar) यांचा उमेदवारी अर्ज अखेर छाननीदरम्यान अवैध ठरवून बाद करण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कायदेशीर पडताळणीनंतर हा मोठा निर्णय दिला आहे.

काँग्रेसकडून सूचक म्हणून अर्ज केलेल्या व्यक्तीनेच घेतलेल्या हरकतीमुळे पक्षाच्या उमेदवारावर ही नामुष्की ओढावली आहे. यामुळे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे.

मित्र समजून ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्याने केसाने गळा कापला, अशी प्रतिक्रिया देताना काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर भावूक झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपचे राजेंद्र राऊत, शरद पवार राष्ट्रवादीकडून वसंत देशमुख, नागेश अक्कलकोटे, जीवन जानकर, धनंजय डिकोळे, महेश साठे, रमेश बारसकर यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. सोलापूर विधानपरिषदेसाठी एकूण 7 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत.

Nagesh Bhosale Objection : 'ती सही माझी नाहीच', सूचकाच्या एका हरकतीने गेम उलटला

काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होण्यामागे एक नाट्यमय घडामोड कारणीभूत ठरली. फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेश भोसले यांचे नाव आणि स्वाक्षरी होती. मात्र, छाननीच्या वेळी नागेश भोसले यांनी अचानक निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत, 'या अर्जावरील सही माझी नाही' असा खळबळजनक आक्षेप घेतला.

या गंभीर हरकतीनंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सूचक नागेश भोसले आणि उमेदवार आदित्य फत्तेपूरकर या दोघांचीही बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली आणि आपला निर्णय काही काळासाठी राखून ठेवला होता. मात्र, अखेर सूचक नागेश भोसले यांची हरकत आणि पुरावे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अधिकृतपणे बाद (Rejected) केला.

BJP Rajendra Raut Application Valid : भाजपचे राजेंद्र राऊत यांचा अर्ज वैध

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे (BJP) अधिकृत उमेदवार आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेना नेते आणि अपक्ष उमेदवार रमेश बारसकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी बारसकर यांची हरकत पूर्णपणे फेटाळून लावत राजेंद्र राऊत यांचा अर्ज कायदेशीर आणि वैध (Valid) ठरवला आहे.

यासोबतच, सोलापूर विधानपरिषदेसाठी अर्ज भरलेले 'न्यू राष्ट्रीय समाज पार्टी'चे उमेदवार अशोक वाघमोडे यांचाही अर्ज बाद करण्यात आला आहे. वाघमोडे यांनी आपल्या अर्जात सूचक आणि अनुमोदक यांच्या बोगस सह्या केल्याचं सिद्ध झाल्यानं त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.

Who is Rajendra Raut : देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू राजेंद्र राऊत कोण आहेत?

भाजपने सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बार्शीचे माजी आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दिलीप सोपल यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही राजेंद्र राऊत यांनी खचून न जाता बार्शी तालुक्यात भाजप संघटन मजबूत केलं. त्यांनी तालुक्यात झालेल्या सर्व स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांना दणदणीत विजय मिळवून दिला.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बार्शी तालुक्यातील 6 पैकी 6 जिल्हा परिषद जागा आणि 12 पैकी 12 पंचायत समिती जागांवर भाजपचा झेंडा फडकवून राऊत यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं. त्यांच्या याच कामगिरीची आणि पक्षनिष्ठेची मोठी दखल घेत भाजप श्रेष्ठींनी त्यांना थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं. आता काँग्रेसचा मुख्य उमेदवारच बाद झाल्याने राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे.

Author : आफताब शेख, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha