Suryakumar Yadav मुंबई : भारताच्या टी 20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव यानं टी 20 वर्ल्ड कपमधील एक प्रसंग सांगितला आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं घेतलेल्या मुलाखतीमध्ये सूर्यकुमार यादवनं कुलदीप यादवसोबत घडलेला किस्सा सांगितला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना दोन्ही संघांसाठी आणि दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचा असतो. सुर्यकुमार यादवनं पाकिस्तान विरोधातील सामन्यात कुलदीप यादव का नाराज होता याची आठवण सांगितली. कुलदीप यादव याच्यावर सूर्या का रागावलेला हे देखील स्पष्ट झालं.
सूर्यकुमार यादव म्हणाला की पाकिस्तान विरोधातील हायव्होल्टेज सामन्यात गोलंदाजीची संधी न मिळाल्यानं तो नाराज होता. त्याचवेळी कुलदीप यादवनं कॅच देखील सोडला होता. कुलदीप यादवनं कॅच घेण्यासाठी प्रयत्न देखील न केल्यानं राग आलेला, असं सूर्या म्हणाला. भारतानं त्या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केलं होतं. ईशान किशन यानं 77 धावांची खेळी केल्यानं त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता.
सूर्या कुलदीपवर का रागावलेला?
कुलदीप यादव यानं कॅच घेण्याचा प्रयत्न न केल्यानं सूर्यकुमार यादव नाराज झाला होता. याशिवाय हार्दिक पांड्या देखील कुलदीप यादववर नाराज झाला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन भारतीय टीममध्ये सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर काही महिन्यानंतर सूर्यकुमार यादवनं त्यासंदर्भात भाष्य केलं आहे.
सूर्यकुमार यादव म्हणाला की जेव्हा मॅच सुरु झाली तेव्हा कुलदीप यादवनं गोलंदाजी करण्याची वेळ नव्हती, तो थोडासा नाराज होता आणि त्याला गोलंदाजी करायची होती. मी अक्षर पटेलचा स्पेल पूर्ण केला नंतर तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्यानं गोलंदाजी केली होती. कुलदीप यादवनं म्हटलं, माझ्या गोलंदाजीची वेळ का येत नाही? कुलदीप यादव जेव्हा लाँग ऑनवर होता तेव्हा कॅच घेतला जाऊ शकला असता, त्याच्या क्षमतेनुसार तो सोपा कॅच होता.
सूर्यकुमार यादव म्हणाला की कुलदीप यादवनं कॅच सोडल्यानं मी त्यावेळी त्याच्यावर रागावलो होतो. प्रयत्न करुन कॅच सुटला असता तर ठीक होतं, मात्र त्यानं फार प्रयत्नच केला नव्हता. टीव्हीवर कुलदीप यादव आणि माझ्यात जो तणाव दिसला तो प्रत्यक्षात नव्हता.
माजी कर्णधार सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की मॅचनंतर दोघे भेटलो त्यावेळी एकमेकांकडे रागानं पाहिलं. असं स्क्रीनवर पाहिल्यानंतर वाटलं पण ती चेष्टा होती. त्यानंतर अहमदाबादमध्ये रील बनवून वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केल्याचं सूर्यानं म्हटलं.
Author : जगदीश ढोले

