T20 Mumbai League 2026 : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2026 चा थरार संपताच आता मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर स्थानिक क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. 'मुंबई टी20 लीग'चा (Mumbai T20 League) नवा सीझन आयपीएलच्या सांगतेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 1 जून 2026 पासून सुरू होत आहे.
यंदाच्या या धमाकेदार हंगामासाठी गतविजेते 'मराठा रॉयल्स' (Maratha Royals) पूर्णपणे सज्ज झाले आहेत. अनुभवी खेळाडू सिद्धेश लाडच्या (Siddhesh Lad) नेतृत्वात खेळणाऱ्या मराठा रॉयल्सनं गेल्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धेचं थेट विजेतेपद पटकावलं होतं. यंदाही त्याच ईर्षेनं आणि तयारीनं आपला संघ मैदानात उतरत असल्याचा विश्वास कर्णधार सिद्धेश लाड आणि मुख्य प्रशिक्षक अमित दाणी यांनी व्यक्त केला.
मुंबईत पार पडली पत्रकार परिषद
मराठा रॉयल्स संघाची अधिकृत पत्रकार परिषद नुकतीच मुंबईमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेला संघाचा कर्णधार सिद्धेश लाड, प्रशिक्षक अमित दाणी, संघाचे मुख्य मालक मयांक खांडवाला, सीईओ (CEO) पराग मोरे आणि अलिशा बाहेती उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धेश लाडनं गतवर्षीप्रमाणेच या नव्या सीझनमध्येही मराठा रॉयल्सकडून अत्यंत दमदार आणि आक्रमक कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
'आमच्याही संघात वैभव सूर्यवंशी'
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सनं प्ले ऑफ्समध्ये धडक मारली होती. मात्र, दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पण राजस्थानच्या अवघ्या साडेपंधरा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) या हंगामात सर्वाधिक षटकार मारत ख्रिस गेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला आणि धावांचा रतीब घातला.
पत्रकार परिषदेत सिद्धेश लाडला वैभव सूर्यवंशीच्या याच वादळी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सिद्धेश म्हणाला, 'या सीझनमध्ये गतविजेते असल्यामुळे नक्कीच आमच्यावर चांगला कामगिरी करण्याचा दबाव असेल. आमची जोरात तयारी सुरू आहे. आमच्याही संघात काही 'वैभव सूर्यवंशी' लपलेले आहेत. साहिल जाधवनं गेल्या वर्षी अप्रतिम कामगिरी केली होती, तो यंदाही संघात आहे. सोबतच अनेक नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी दिली आहे.'
सलामीला येण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाचा
मुंबई क्रिकेटचा 'संकटमोचक' अशी सिद्धेश लाडची एक वेगळी ओळख आहे. मुंबईच्या रणजी संघाकडून खेळताना सिद्धेश नेहमीच मधल्या फळीत (Middle Order) खेळून संघाचा डाव सावरतो. मात्र, मुंबई टी20 लीगच्या गेल्या मोसमात मराठा रॉयल्सकडून खेळताना सिद्धेशनं सर्वांनाच चकित करत सलामीला (Opening) फलंदाजी केली होती. याचविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सिद्धेश लाडनं स्पष्ट केले की, "सलामीला फलंदाजीसाठी येण्याचा निर्णय हा केवळ माझा एकट्याचा नसून तो संघव्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षकांचा संयुक्त निर्णय होता, ज्याचा संघाला फायदा झाला."
एमसीएच्या स्पर्धांमधून सापडले गुणवान खेळाडू
मराठा रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक अमित दाणी यांनी संघनिवडीबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित करत असलेल्या विविध स्थानिक स्पर्धांचा संघ निवडताना खूप मोठा फायदा झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 'प्रेसिडेंट चषक' (President Cup) आणि इतर अनेक स्थानिक टूर्नामेंट्समधून मुंबईतील अनेक गुणवान आणि नवोदित खेळाडू शोधणे सोपे झाले, ज्यांना मराठा रॉयल्सने आपल्या संघात स्थान दिले आहे.
आयपीएल स्टार तुषार देशपांडे 'ट्रम्प कार्ड'
प्रशिक्षक अमित दाणी आणि कर्णधार सिद्धेश लाड या दोघांनीही वेगवान गोलंदाज आणि आयपीएल स्टार तुषार देशपांडेकडून (Tushar Deshpande) संघाला खूप मोठ्या अपेक्षा असल्याचं सांगितलं. यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये तुषार देशपांडेने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याच्या या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधील मोठ्या अनुभवाचा थेट फायदा मुंबई टी२० लीगमध्ये मराठा रॉयल्स संघाला आपले जेतेपद टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वास संघाने व्यक्त केला.
1 जून ते 13 जून दरम्यान रंगणार स्पर्धा
यंदाची ही बहुप्रतिक्षित 'मुंबई टी20 लीग 2026' स्पर्धा 1 जून ते 13 जून 2026 या कालावधीत वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या प्रतिष्ठित विजेतेपदासाठी एकूण आठ तगडे संघ मैदानात एकमेकांसमोर ठाकणार आहेत. स्पर्धेचे अत्यंत महत्त्वाचे उपांत्य सामने (Semifinals) 11 जून रोजी होणार असून, महाअंतिम सामना (Final Match) 13 जून रोजी खेळवला जाईल.
Author : सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई

