Dailyhunt
Thalapathy Vijay : सत्तास्थापनेसाठी विजय यांचा दावा, 112 आमदारांचे पत्र; राज्यपाल म्हणाले, आधी 118 आमदारांच्या सह्या दाखवा

Thalapathy Vijay : सत्तास्थापनेसाठी विजय यांचा दावा, 112 आमदारांचे पत्र; राज्यपाल म्हणाले, आधी 118 आमदारांच्या सह्या दाखवा

ABP माझा 5 days ago

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या थलापती विजय (Thalapathy Vijay) यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. थलापती विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

त्यावेळी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र आधी द्या, अशी मागणी राज्यपालांनी केल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी आपल्याला 118 आमदारांचा पाठिंबा असल्याचं राज्यपालांना सांगितलं आहे. त्याचवेळी त्यांनी टीव्हीके पक्षाच्या 108 आणि इतर 4 अशा 112 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिलं आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांच्या सह्या दाखवा, असे निर्देश राज्यपालांनी विजय यांना दिल्याची माहिती आहे.

तामिळनाडूच्या विधानसभेत थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या आहेत. तर स्टॅलिन यांच्या डीएमकेला 59 आणि AIADMK पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला 5 आणि पीएमके पक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत.

Thalapathy Vijay Claim To Form Goverment : शपथविधीसाठी टीव्हीकेची तयारी सुरू

दरम्यान, विजय हे 7 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती असून टीव्हीकेने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचमुळे विजय यांच्याकडून जलदगतीने हालचाल करत बहुमताचा आकडा जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तामिळनाडूतील निकालानंतर विजय यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढली असून बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tamil Nadu Politics : काँग्रेसच्या पाठिंब्याने समीकरण बदलले

काँग्रेसने विजय यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने तामिळनाडूच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. पारंपरिक द्रविड पक्षांपासून दूर जात मतदारांनी नवा पर्याय निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाठिंब्यामुळे विजय यांचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न अधिक बळकट झाले आहेत.

Tamil Nadu Election Result : प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का

या निवडणुकीत डीएमके आणि एआयएडीएमकेसारख्या पारंपरिक पक्षांना मोठा धक्का बसला आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या राजकीय वर्चस्वाला या निकालाने मोठे आव्हान दिले आहे. विजय यांच्या नव्या नेतृत्वाला जनतेने मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.

Tamil Nadu Government Formation : पुढील राजकीय हालचालींवर नजर

आता राज्यपालांची भूमिका, इतर पक्षांचा पाठिंबा आणि अंतिम आकडेवारी यावर सरकार स्थापनेचा मार्ग अवलंबून असेल. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यास तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Author : एबीपी माझा ब्युरो

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha