Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती

Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती

ABP माझा 1 week ago

Thane Ring Metro Project Protest : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 29 किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो (Thane Internal Ring Metro) प्रकल्पाला आता स्थानिक नागरिक आणि 'सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे' (Citizens for Sustainable Transport Thane) या संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे.

तब्बल 12,000 कोटी रुपयांच्या या अवाढव्य खर्चिक प्रकल्पामुळे ठाण्यातील पर्यावरण, मुख्य रेल्वे स्थानक परिसर आणि शहराच्या एकूण रचनेवर अत्यंत गंभीर आणि विपरीत परिणाम होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. योग्य नियोजनाअभावी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या प्रचंड तोट्याचा ठरून भविष्यात ठाणेकरांसाठी केवळ एक 'पांढरा हत्ती' ठरू शकतो, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Thane Citizens Committee Meeting : तज्ज्ञांनी मांडला अभ्यासाचा अहवाल

या प्रकल्पाच्या विरोधात आयोजित पत्रकार परिषदेत नामवंत नगररचनाकार, लेखिका आणि वास्तुविशारद सुलक्षणा महाजन, प्रख्यात वकील हेमा रमानी, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांच्यासह ठाण्यातील अनेक सजग रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे' या संघटनेच्या प्रतिनिधींनी मागील दोन महिन्यांपासून या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या विविध तांत्रिक आणि भौगोलिक बाजूंचा सखोल अभ्यास केला होता. या अभ्यासातून समोर आलेली धक्कादायक माहिती आणि सादरीकरण (Presentation) यावेळी ठाणेकरांसमोर मांडण्यात आले.

Metro Technical Environmental Issues : तज्ज्ञांनी उपस्थित केलेले 5 मुख्य आक्षेप

1. तीव्र वळणांमुळे खर्च वाढणार : प्रस्तावित मेट्रो मार्गामध्ये तब्बल 82 तीव्र वळणे (Sharp Turns) आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या वळणांमुळे मेट्रोचा दैनंदिन देखभाल (Maintenance) आणि संचालन खर्च (Operational Cost) कमालीचा वाढणार आहे.

2. ठाणे स्थानक परिसराला फटका : ठाणे रेल्वे स्थानकाजवळ केल्या जाणाऱ्या भुयारी कामांमुळे (Underground Construction) येथील अनेक जुन्या इमारती, व्यावसायिक दुकाने आणि काही सार्वजनिक सुविधा कायमच्या हटवाव्या लागू शकतात, ज्यामुळे मोठा विस्थापन प्रश्न निर्माण होईल.

3. अपुरे नियोजन आणि अवास्तव अंदाज : प्रस्तावित मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी बस, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी कोणतेही पुरेसे आणि एकात्मिक नियोजन करण्यात आलेले नाही. तसेच प्रकल्प अहवालात दाखवण्यात आलेली संभाव्य प्रवासी संख्या (Ridership) अत्यंत अवास्तव आणि फुगवून सांगितलेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

4. 3,200 पेक्षा जास्त झाडांची कत्तल : या प्रकल्पाच्या उभारणीत ठाण्यातील तब्बल 3,200 पेक्षा अधिक जुन्या आणि मोठ्या झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. यामध्ये अनेक हेरिटेज (वारसा) वृक्षांचा समावेश असून, त्यांची अधिकृत प्रशासकीय नोंदच अपुरी असल्याचे सांगण्यात आले.

5. नागपूर मेट्रोचा चुकीचा संदर्भ : ठाणे मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प अहवालात (DPR) थेट नागपूर मेट्रोचा संदर्भ आणि आकडेवारी वापरण्यात आली आहे. ठाणे आणि नागपूरच्या भौगोलिक तसेच सामाजिक परिस्थितीत प्रचंड फरक असताना, ठाण्याची वेगळी भौगोलिक परिस्थिती प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचा आरोपही तज्ज्ञांनी केला.

Sustainable Urban Planning Demand : लोकसहभागातून नगरनियोजन करण्याची मागणी

'सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे' या संघटनेने आणि उपस्थित तज्ज्ञांनी स्पष्ट केलं की, वाढत्या ठाणे शहरासाठी एक मजबूत आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transport System) असणे अत्यंत आवश्यक आहे, या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. मात्र, सरकारने केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी न करता, संपूर्ण तथ्यांच्या आधारे आणि थेट लोकसहभागातून (Public Participation) योग्य नगरनियोजन करावे. प्रशासनाने नागरिकांच्या या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Author : अक्षय भाटकर, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha