Pune Hooch Tragedy Connection : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूचे सेवन केल्यामुळे तब्बल 22 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण 'मृत्यू तांडवा'नंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन शोधून काढत एक मोठी कारवाई केली.
एफडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
Bhivandi Rex International Raid : गोदामावर छापा, 5,929 किलो रसायन जप्त
पुण्यात झालेल्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विषारी दारू बनवण्यासाठी ज्या मुख्य केमिकलचा वापर करण्यात आला होता, त्याचा पुरवठा भिवंडीतून झाल्याचे तपासात निष्पन्न झालं. त्यानुसार, एफडीएच्या विशेष पथकानं भिवंडी परिसरातील 'मे. रेक्स इंटरनॅशनल' (M/s Rex International) कंपनीच्या गोदामावर अचानक धडक छापा टाकला.
या कारवाईत मानवी जिवासाठी अत्यंत घातक असलेल्या 'मिथेनॉल' (Methanol) या विषारी रसायनाचा सुमारे 5,929 किलोग्रॅमचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. पुण्यात विकल्या गेलेल्या दारूच्या भेसळीसाठी मुख्य रसायन याच कंपनीकडून पुरवण्यात आलं होतं. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या अत्यंत विषारी आणि घातक द्रव्याची कोणतीही अधिकृत खरेदी-विक्रीची नोंद किंवा साठा कंपनीच्या नोंदवहीत (Register) उपलब्ध नव्हती.
Pune Methanol Supply Chain : वानखेडे आणि प्रजापतीच्या साखळीतून विक्री
पोलीस आणि एफडीएच्या संयुक्त तपासात या विषारी रसायनाच्या पुरवठ्याची संपूर्ण साखळी (Supply Chain) आता समोर आली आहे. भिवंडीच्या 'मे. रेक्स इंटरनॅशनल' कंपनीकडून बेकायदेशीरपणे पुरवण्यात आलेले हे मिथेनॉल केमिकल हे कर्नालसिंग विरका, मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि उरळी कांचन येथील राजू प्रजापती यांच्या गुन्हेगारी साखळीच्या माध्यमातून पुण्यात पोहोचले होते. अधिक नफा कमवण्यासाठी या रसायनाचा वापर करून हातभट्टीची दारू बनवण्यात आली आणि ती वेगवेगळ्या अड्ड्यांवर विकली गेली, ज्याने 22 जणांचा बळी घेतला.
Thane FDA Action : ठाण्यात 6 आरोपींना अटक; 7 लाखांचा माल जप्त
अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील एफडीए अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची कसून तपासणी करून तब्बल 7 लाख 30 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे.
या प्रकरणात प्रतिबंधित व आरोग्यास हानिकारक अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला 4 लाख 53 हजार 344 रुपयांचा इतर मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe Guidelines : 25 मे रोजी स्वीकारला कार्यभार
भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा नवीन कार्यभार स्वीकारला आहे. पदभार हाती घेताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कडक इशारा दिला होता. त्यांनी सर्व विभागांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तातडीने धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत कडक निर्देश दिले. आयुक्तांच्या या आदेशानंतर यंत्रणेनं कमालीची तत्परता दाखवत बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई केली.
Author : राजू सोनावणे

