Dailyhunt
Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: 'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: 'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?

ABP माझा 1 week ago

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: आपल्या पहिल्या पोस्टर मधूनच चित्रपटाच्या नावाविषयी, यातील कलाकारांविषयी आणि चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असेल? याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा चित्रपट म्हणजे, 'तुंबाडची मंजुळा'.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा धमाल आणि उत्कंठावर्धक टिझर आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. येत्या 5 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमधून 'मंजुळा' या नावाविषयी तयार झालेलं गुढतेचं वलय, त्यावरून गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि त्यांची उडालेली तारांबळ दिसत आहे. या गावकऱ्यांमध्ये एकाहून एक अतरंगी कलाकार दिसत असून यामध्ये जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), ओम भुतकर (Om Bhutkar), मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), अंशुमन विचारे (Anshuman Vichare), योगेश शिरसाट (Yogesh Shirsat), गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके (Reel Star Atharva Ruke), नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांचा समावेश आहे. यातही एका भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या वेशात दिसणारे मकरंद अनासपुरे यांचा लूक, त्यांची देहबोली आणि संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच सगळ्यात जास्त आकर्षणाचा विषय ठरली आहे टीझरच्या शेवटी एका अर्धवट बंद दाराआड उभी दिसणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar). यामध्ये सईची काय भूमिका असेल? याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.

'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाविषयी झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, "यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल यावर आम्ही भर दिला. आता प्रदर्शित झालेल्या टिझरमधून दिसणारी कलाकारांची फौज, त्यांचे धमाल संवाद हे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुळात कोकण प्रांत आणि कोकणातील लोकांच्या गजाली हा कायमच आपल्या आवडीचा विषय असतो. कोकणातील अशाच एका गावाची, त्यातील गावकऱ्यांची आणि गावात घडणाऱ्या एका अद्भुत घटनेची गोष्ट म्हणजे तुंबाडची मंजुळा हा चित्रपट. सर्वच स्तरांतील, वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल आणि सहकुटुंब बघता येईल असा हा मनोरंजक चित्रपट झाला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर झी स्टुडिओजने पूर्णपणे निर्मितीची धुरा सांभाळली आहे याचा आनंद आहे..."

दरम्यान, ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 5 जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

पाहा टीझर :

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha