Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

ABP माझा 5 days ago

मुंबई : राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर टीका करताना काँग्रेसने गुंगी गुडिया असा शब्द वापरल्याने राष्ट्रवादीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) समर्थक कार्यकर्ते, काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात घुसले होते, विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केले. तर, सपकाळ यांनी या टीकेचं समर्थन करत, सुनेत्रा पवारांनी कृतीतून दाखवून द्यावे, असे म्हटले. आता, काँग्रेसच्या या टीकेवरुन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही (Sunil Tatkare) काँग्रेसला लक्ष्य करत थेट इशारा दिला आहे. तसेच, संबंधित ट्विट हटवण्याचीही मागणी केलीय

महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचा अपमान खपवून घेणार नाही. काँग्रेसने केलेल्या अपमानकारक पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची व सुनेत्रावहिनींची यांची जाहीर माफी मागावी, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ट्विट करुन इशारा दिला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट ही त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही असू शकतो. परंतु महिलांचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर घसरलेली भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटलंय.

काँग्रेसने माफी मागावी - तटकरे

राजकारणात विचारांचा मुकाबला विचारांनी व्हावा, मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर द्यावे. परंतु जेव्हा एखादा पक्ष महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरतो, तेव्हा तो आपल्या संस्कारांचा आणि राजकीय संस्कृतीचा खरा चेहरा जनतेसमोर आणतो. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सुसंस्कृत संवादाची आहे, व्यक्तीचा अपमान करण्याची नाही. काँग्रेसने या पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची आणि सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी. मतभेद लोकशाहीचा भाग आहेत; मात्र महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी काँग्रेसला इशारा देखील दिलाय. तर, प्रफुल पटेल यांनीही ट्विट करुन निषेध व्यक्त केलाय.

काँग्रेसने पोस्ट तात्काळ मागे घ्यावी - प्रफुल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून करण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेचा आम्ही तीव्र निषेध करतो. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही स्वीकारला जाणार नाही. ज्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांसारख्या महिला नेत्या करत आहेत, त्याच पक्षाकडून एका महिला नेत्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. काँग्रेसने संबंधित पोस्ट तात्काळ मागे घेऊन जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात प्रफुल पटेल यांनीही या वक्तव्याचा निषेध केलाय.

हेही वाचा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

Author : निलेश बुधावले, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha