Uday Samant: आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) आपली मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी आम्ही 'महायुती' म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत," असे स्पष्ट प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात केले.
पुण्यात स्वबळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
कोल्हापुरातून शिवसेनेच्या बांधणीचा श्रीगणेशा
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेच्या प्रचाराची पहिली सभा कोल्हापुरात होत असे. हाच वारसा जपत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत असावी, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी असावी, याबाबत महत्वपूर्ण बैठक घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. कोल्हापुरात विधानसभेच्या जागा 10 वरून 13 झाल्या, तर शिवसेना किती जागा मागणार? या प्रश्नावर सामंत म्हणाले की, "किती जागा लढवायच्या आणि कोणासोबत युती करायची याबाबत आमची रणनीती आम्ही योग्य वेळी जाहीर करू." कोल्हापूर लोकसभेसाठी संजय मंडलिक किंवा जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्याला दीड लाख मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बारामतीची जागा बिनविरोध व्हावी हीच इच्छा
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना सामंत यांनी विधान केले. "बारामतीची जागा ही पारंपारिकपणे पवार कुटुंबाची आहे. अजितदादा सध्या आपल्यासोबत असल्याने ही जागा बिनविरोध व्हावी, अशी आमची विनंती आहे. त्यासाठी सुनेत्रा वहिनींनी उद्धव ठाकरे यांना फोन केला असेल, तर त्यात काहीही गैर नाही," असे ते म्हणाले.
गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र
गणेश नाईक यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले की, टीआरपी मिळवण्यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत आहेत. शिंदे यांच्यावर बोलण्याइतके नाईक मोठे नाहीत. तसेच, जितेंद्र आव्हाड आणि नितेश राणे यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष घालतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रातोरात पुतळे काढणे हे प्रशासनाचे काम नाही
पुतळा बसवण्यासाठी निश्चित नियम आहेत, त्याचे पालन होणे गरजेचे आहे. कोणाला वाटते म्हणून रातोरात पुतळे काढणे हे प्रशासनाचे काम नाही, असे त्यांनी सुनावले. अशोक खरात प्रकरणात त्यांनी अशा प्रवृत्तींना ठोकून काढले पाहिजे. खरात यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही, उलट या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हीच आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : विजय केसरकर, एबीपी माझा

