आयपीएल 19व्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना पहिल्या पर्वातील विजेता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुल्लांपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.
या मोठ्या सामन्यात राजस्थानचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वैभव सूर्यवंशीने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत 18 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या. याचबरोबर आयपीएल 2026 मध्ये पॉवरप्ले म्हणजेच पहिल्या 6 षटकांत त्याने 500 धावांचा टप्पा पार केला.
आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
याआधी आयपीएल 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये 467 धावा केल्या होत्या.
वैभव सूर्यवंशीने याच सामन्यात आयपीएल 2026 मध्ये आपल्या 700 धावाही पूर्ण केल्या.
अनकॅप्ड खेळाडू म्हणून IPLच्या एका हंगामात 700 धावा करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
त्याने या हंगामात 16 सामन्यांत 47.40 च्या सरासरीने 711 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 239.39 इतका आहे. याआधी यशस्वी जैस्वालने IPL 2023 मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून 625 धावा केल्या होत्या.
यासोबत, वैभव सूर्यवंशीने अवघ्या 440 चेंडूंमध्ये आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण केल्या आहे, तो सर्वात वेगवान हजार धावा करणार भारतीय खेळाडू बनला आहे.

