Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?

विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?

ABP माझा 1 week ago

DK Shivakumar: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला. बंगळूरु येथे पत्रकार परिषद घेत ते म्हणाले, "हायकमांडने सांगितल्यावर मी राजीनामा देईन, हे मी आधीच सांगितले होते.

काल हायकमांडने तसे सांगितले आणि आज मी राजीनामा दिला." त्यांनी सांगितले की, त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या सचिवांकडे सादर केला आहे. गेहलोत सध्या कौटुंबिक कारणांमुळे बंगळूरुबाहेर आहेत. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेही उपस्थित होते. मात्र, पत्रकार परिषदेदरम्यान पुढील मुख्यमंत्री कोण होणार, हे उघड करण्यात आले नाही.

यापूर्वी, सिद्धरामय्या यांनी आपल्या घरी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांना या निर्णयाची माहिती दिली. बैठकीदरम्यान डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचे आर्शीवाद घेतले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. दरम्यान, राज्यमंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले की, डी. के. शिवकुमार यांच्या नावावर एकमत झाले असून, ते आता कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील.

कर्नाटकच्या राजकारणात जेव्हा कधी सत्ता, संघटना आणि रणनीतीवर चर्चा होते, तेव्हा 64 वर्षीय डी. के. शिवकुमार यांचे नाव अग्रस्थानी असते. डीके शिवकुमार हे केवळ एक नेते नाहीत, तर त्यांना काँग्रेसचे संकटमोचक मानले जाते. जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला, तेव्हा त्यांनी पुढे येऊन परिस्थिती हाताळली. बंडखोर आमदारांना समजावणे असो किंवा सरकार वाचवणे असो, शिवकुमार नेहमीच काँग्रेसच्या रणनीतीच्या केंद्रस्थानी होते.

सलग 8 टर्म विजयी आणि 'जायंट किलर'

डी. के. शिवकुमार यांचा जन्म 15 मे 1962 रोजी रामनगर जिल्ह्यातील कनकपुरा येथे झाला. अत्यंत तरुण वयात, म्हणजेच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी युथ काँग्रेसमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1989 मध्ये त्यांनी कनकपुरा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला 2004 ची निवडणूक. त्यांनी कर्नाटकाचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात निवडणूक लढवून सर्वांना चकित केले. या अत्यंत चुरशीच्या लढाईत शिवकुमार यांनी देवेगौडा यांच्यासारख्या महाकाय नेत्याला पराभूत करून 'जायंट किलर' अशी ओळख मिळवली. आजपर्यंत त्यांनी सलग 8 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून, त्यांना आपल्या कारकिर्दीत एकाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.

वोक्कलिगा समाजाचे नेतृत्व आणि राजकीय प्रभाव

डी. के. शिवकुमार हे कर्नाटकातील अत्यंत प्रभावशाली अशा 'वोक्कलिगा' (Vokkaliga) समाजातून येतात. कर्नाटकच्या राजकारणात 'लिंगायत' समाजानंतर वोक्कलिगा हा दुसरा सर्वात मोठा आणि निर्णायक मतदारसंघ मानला जातो. जुन्या म्हैसूर भागात या समाजाचा प्रचंड दबदबा आहे. पारंपारिकपणे वोक्कलिगा समाज हा एच. डी. देवेगौडा यांच्या जेडीएस (JDS) पक्षाचा पाठीराखा मानला जात होता. परंतु, डी. के. शिवकुमार यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे हा समाज मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे वळला. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या ऐतिहासिक विजयामागे वोक्कलिगा मतांचे शिवकुमार यांनी केलेले ध्रुवीकरण हेच मुख्य कारण होते. आज ते या समाजाचे सर्वात मोठे आणि सर्वमान्य नेते म्हणून उदयास आले आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक'

शिवकुमार यांची खरी ताकद त्यांच्या 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' आणि व्यवस्थापन कौशल्यात आहे. पक्षा एकनिष्ठ राहून त्यांनी अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या.
विलासराव देशमुख सरकार वाचवले (2002)

महाराष्ट्रात तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्यासाठी मोठी व्यूहरचना केली होती. काँग्रेस सरकार अल्पमतात येण्याची चिन्हे असताना, हाय कमांडने ही जबाबदारी शिवकुमार यांच्यावर सोपवली. त्यांनी महाराष्ट्रातील 40 आमदारांना बेंगळुरूच्या 'ईगलटन रिसॉर्ट'मध्ये सुरक्षित ठेवले आणि अविश्वास प्रस्तावाच्या दिवशी त्यांना सुरक्षित मुंबईत आणून विलासराव देशमुखांचे सरकार वाचवले.

अहमद पटेल यांची प्रतिष्ठा राखली (2017)

सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. गुजरात काँग्रेसचे आमदार फुटू नयेत म्हणून शिवकुमार यांनी 44 आमदारांना कर्नाटकातील बिदादी येथील रिसॉर्टमध्ये आणून कडक पहाऱ्यात ठेवले. केंद्रीय यंत्रणांचा दबाव असूनही त्यांनी एकही आमदार फुटू दिला नाही आणि अहमद पटेल यांचा विजय सुकर केला.

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकार (2018)

कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यावर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी जेडीएससोबत आघाडी घडवून आणली आणि आमदारांना सुरक्षित ठेवत एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार स्थापन करण्यात जादू दाखवली.

पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाचे कारण

गांधी कुटुंब (विशेषतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी) डी. के. शिवकुमार यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची 'शंभर टक्के निष्ठा' आणि 'डिलिव्हरी रेट'. राजकारणात कितीही कठीण प्रसंग आले, ईडी (ED) किंवा आयटी (IT) सारख्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला, अगदी तुरुंगात जावे लागले, तरीही शिवकुमार यांनी कधीही काँग्रेसची साथ सोडली नाही किंवा पक्षाशी गद्दारी केली नाही. "पक्ष देईल ती जबाबदारी आणि आदेश पाळणे" हा त्यांचा स्वभाव असल्याने ते हाय कमांडचे अत्यंत विश्वासू बनले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha