Vinesh Phogat Asian Games Selection Trials : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये शानदार सुरुवात करत पहिल्याच सामन्यात ज्योतीचा 7-1 अशा फरकाने पराभव केला.
दीर्घ काळानंतर स्पर्धात्मक कुस्तीमध्ये पुनरागमन करत असलेल्या विनेशकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि तिने आपल्या अनुभवाच्या जोरावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रायलमध्ये विनेश फोगाटचा एकतर्फी विजय (Vinesh Phogat Asian Games Selection Trials)
सामन्याच्या सुरुवातीला विनेश काहीशी सावध दिसत होती. तिने प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत उभी राहून खेळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काही मिनिटांत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची झुंज पाहायला मिळाली. मात्र, विनेशने नंतर 'पुश पॉइंट' मिळवत खाते उघडले. त्यानंतर तिने प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही पायांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून तिला गुण मिळवता आले नाहीत.
दुसऱ्या पीरियडमध्ये मात्र विनेशने आपली लय पकडली. क्लॉकवर ठेवण्यात आल्यानंतर तिने अधिक आक्रमक भूमिका घेतली. उजव्या पायावर अचूक हल्ला करत ज्योतीला खाली पाडले आणि 3-0 अशी आघाडी घेतली. ज्योतीनेही पुनरागमनाचा प्रयत्न करत विनेशच्या पायावर हल्ला चढवला, मात्र अनुभवी विनेशने तो डाव सहज हाणून पाडला. त्यानंतर तिने वेगवान आणि अचूक चालींचा वापर करत सलग गुण मिळवले आणि स्कोअर 7-0 असा केला. अखेरीस ज्योतीला एक पुशआऊट गुण मिळाला, पण तोपर्यंत सामना विनेशने जिंकला होता.
वजन करताना पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा (Vinesh Phogat Asian Games Trials)
दरम्यान, अधिकृत वजनमापनावेळी मोठा वाद निर्माण झाला. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी विनेशला फक्त 50 किलो वजनी गटातच खेळण्याची परवानगी दिली होती. कारण तिच्या मागील काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा, त्यात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचाही समावेश आहे, तिने 50 किलो गटात खेळल्या होत्या. मात्र विनेशने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत 53 किलो गटात खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
डब्ल्यूएफआय अध्यक्ष संजय सिंह यांनी केला हस्तक्षेप
वाद वाढल्यानंतर संजय सिंह यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर विनेशचे पुन्हा वजन करण्यात आले आणि तिचे वजन 53.9 किलो नोंदवले गेले. परिणामी तिला 53 किलो वजनी गटाच्या ड्रॉमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. विनेशने यावेळी आपण किमान आणखी दोन वर्षे स्पर्धात्मक कुस्ती खेळणार असल्याचेही स्पष्ट केले.
न्यायालयने दिली परवानगी
विशेष म्हणजे, अलीकडेच न्यायालयने तिला प्रतिष्ठित खेळाडू म्हणून मान्यता देत आशियाई क्रीडा स्पर्धेत निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले होते. आता या ट्रायल्समधील विजेत्या खेळाडूला आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विनेशच्या पुढील सामन्यांकडे संपूर्ण भारतीय क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.
Author : किरण महानवर

