Watermelon Death Case Mumbai: पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाला, अशी बाब फोरेन्सिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक चर्चेतून निष्पन्न झाली आहे.
Watermelon Death Case Mumbai: नेमके काय घडले?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर कुटुंबातील चारही जणांना पोटदुखी, उलट्या आणि अतिसाराचा (जुलाब) त्रास सुरू झाला. त्यांनी सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतले, ज्यामुळे त्यांना काही काळ आराम मिळाला. मात्र, थोड्या वेळाने प्रकृती पुन्हा खालावली. प्रकृती गंभीर असतानाही रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी ते घरीच थांबले. अखेर प्रकृती हाताबाहेर गेल्यावर त्यांना सकाळी 11 ते पावणे 12 च्या सुमारास जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
Watermelon Death Case Mumbai: 'गोल्डन अवर' गमावला
वैद्यकीय क्षेत्रात 'गोल्डन अवर' (तात्काळ उपचाराचा पहिला तास) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात उपचार न मिळाल्यास शरीरातील विषबाधेची लक्षणे अधिक तीव्र होतात. डोकाडिया कुटुंबाच्या बाबतीत उपचारात झालेला साडेपाच तासांचा विलंब त्यांच्या जीवावर बेतला का? अशी शंका उपस्थित होत आहे.
Watermelon Death Case Mumbai: अन्नामध्ये 'मॉर्फिन' असल्याचा संशय
शवविच्छेदनानंतर घेतलेल्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात तीव्र स्वरूपाची विषबाधा झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांना अन्नामध्ये 'मॉर्फिन'सारखे धोकादायक विषारी पदार्थ असण्याचा संशय आहे. मात्र, कलिंगडामुळे विषबाधा झाली की अन्य कोणत्या पदार्थामुळे, याचा अंतिम निष्कर्ष अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) येणे बाकी आहे.
Watermelon Death Case Mumbai: पोलीस तपास आणि कायदेशीर कारवाई
जे.जे. मार्ग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. "सध्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली असून सुमारे डझनभर लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण 'विषशास्त्र अहवाल' (Toxicology Report) आल्यानंतरच स्पष्ट होईल. अहवाल प्राप्त होताच या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे पोलिसांनी सांगितले आहे.
Author : जयदीप मेढे

