West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने अभूतपूर्व असे यश मिळवले. भाजपने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal news) स्वबळावर सत्ता मिळवून नवा इतिहास घडवला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 207 जागांवर भाजपने विजय मिळवला, तर गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला (TMC) अवघ्या 80 जागांवर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालमधील या पराभवामुळे एकप्रकारे ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचा एक सोनेही अध्याय संपुष्टात आला आहे. 2014 मध्ये केंद्रात भाजपची (BJP) सत्ता आल्यापासून भाजपने टप्याटप्प्याने पश्चिम बंगालमधील आपली ताकद आणि मतदानाची टक्केवारी वाढवत नेली. यापूर्वी पश्चिम बंगाल म्हटले की, ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस असे अविभाज्य समीकरण होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने हे समीकरण 180 अंशांच्या कोनात बदलून टाकले आहे. सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये नाममात्र ताकद असलेल्या भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये याठिकाणी केलेला विस्तार हा अक्षरश: थक्क करणारा आहे. मात्र, याच भाजपचे कमळ पश्चिम बंगालमध्ये रुजवण्यात ममता बॅनर्जींनीच पुढाकार घेतला होता, हे आता कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. (West Bengal Election News)
पश्चिम बंगालमध्ये भाजपने पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांच्यासोबत आघाडीत असताना एक लोकसभेची जागा जिंकली होती. त्यावेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आघाडी होती. भाजपने पहिल्यांदा 1998 साली दमदम लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकली होती. भाजपचे तपन सिकदर यांनी दमदम मतदारसंघातून विजय मिळवला होता. तेव्हा CPI-M चे उमेदवार निर्मल कांति चॅटर्जी पराभूत झाले होते. त्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या मदतीने टीएमसीच्या मतांसह भाजपच्या तपन सिकदर यांना 50.70% तर निर्मल कांति चॅटर्जी यांना 39.70% मते मिळाली होती. तपन सिकदर भाजपने 1998 आणि 1999 या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. तपन सिकदर 1999 ते 2004 अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही होते.
भाजपचा 1998 साली लोकसभेच्या एका जागेवरुन सुरु झालेला हा प्रवास आता विधानसभेच्या 207 जागांपर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्याच्या घडीला पश्चिम बंगालमधील 42 खासदारांमध्येही भाजपचे 12 खासदार आहेत. तर तृणमूल काँग्रेसचे 29 आणि काँग्रेसचा एक खासदार आहे. भाजपची विधानसभा निवडणुकीतील ही घोडदौड पाहता आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या खासदारांची संख्याही वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी ज्या भाजपला पश्चिम बंगालच्या राजकारणात रुजवले त्यांनीच आता ममता बॅनर्जी यांना येथील राजकारणातून हद्दपार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

