Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
W,W,W,W,W,W,W... स्कोअरबोर्ड पाहून विश्वास बसणार नाही! 8 फलंदाज शून्यावर, अतिरिक्त धावा जास्त; 33 चेंडूत सामना संपला, नेमकं घडलं तरी काय?

W,W,W,W,W,W,W... स्कोअरबोर्ड पाहून विश्वास बसणार नाही! 8 फलंदाज शून्यावर, अतिरिक्त धावा जास्त; 33 चेंडूत सामना संपला, नेमकं घडलं तरी काय?

ABP माझा 1 week ago

8 Ducks And 35 All Out Cricket Match Ends In Just 33 Balls : 2026 महिला कॉन्टिनेंटल कपमधील पहिलाच सामना भन्नाट ठरला. तुर्की आणि ऑस्ट्रिया यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रियाचा संघ अवघ्या 35 धावांत ऑलआऊट झाला.

विशेष म्हणजे संघाच्या तब्बल 8 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. उर्वरित तीन फलंदाजांपैकी एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. फलंदाजांपेक्षा ऑस्ट्रियाच्या धावसंख्येत एक्स्ट्राजचे योगदान अधिक होते.

ऑस्ट्रियाची लाजिरवाणी फलंदाजी (Women's Continental Cup Turkey vs Austria)

तुर्कीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रियाचा संघ 8.1 षटकांत अवघ्या 35 धावांत गारद झाला. ऑस्ट्रियाकडून सलामीला आलेल्या श्रीया रेड्डीने 19 चेंडूंत 8 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. शीतल भारद्वाजने 13 चेंडूंत 5 धावा, तर यष्टीरक्षक फलंदाज हादिया सिद्दीकीने 3 धावा केल्या. या तिघांनी मिळून केवळ 16 धावा केल्या.

उर्वरित 19 धावा एक्स्ट्राजमधून आल्या. फलंदाजांनी केलेल्या एकाही धावेत चौकार किंवा षटकाराचा समावेश नव्हता. एक्स्ट्राजमध्ये तब्बल 14 वाइड्स होत्या. तुर्कीकडून हासेर सेलिकने 4 विकेट्स, कर्णधार कुब्रा कनावरसीने 3 विकेट्स, तर एजगी नूर किलिचने 1 विकेट घेतली. हासेरने 2 षटकांत 6, कुब्राने 2 षटकांत 5 आणि एजगीने 2 षटकांत 6 धावा दिल्या.

अवघ्या 33 चेंडूंत तुर्कीचा विजय (Cricket Match Ends In Just 33 Balls)

35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुर्कीनेही दमदार सुरुवात केली. संघाने अवघ्या 5.3 षटकांत म्हणजेच 33 चेंडूंत 2 विकेट्स गमावून विजय मिळवला. जेहरा एंडरने नाबाद 13 धावा करताना 2 चौकार लगावले. मेलिके बायरामने एक षटकार ठोकत नाबाद 11 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 15 चेंडूंत 27 धावांची भागीदारी करत तुर्कीला सहज विजय मिळवून दिला.

तुर्कीची कर्णधार कुब्रा कनावरसी खाते न उघडताच बाद झाली, तर सुजान तुरानने एका चौकारासह 9 धावा केल्या. ऑस्ट्रियाकडून एम. पथिरानेहेलागेने 2 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे महिला कॉन्टिनेंटल कपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रियाची फलंदाजी अक्षरशः कोसळली आणि तुर्कीने 33 चेंडूंत सामना खिशात घातला.

Dev Chaudhary Controversy In DPL : बॅट धरता येईना, कॅचही घेता येईना, ऑक्शनमध्ये नावंही नव्हतं, तरीही DPL मध्ये देव चौधरी मैदानात उतरला; क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठ्या स्कॅमची चर्चा

Author : किरण महानवर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha