Sunday, 09 May, 8.50 pm अहमदनगरLive24

राजकारण
आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे झेडपीच्या आरोग्य विभागातील पदे भरली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण पाहता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 16 हजार आरोग्य कर्मचार्‍यांची पदे भरण्याचे जाहीर केले आहे.

यामुळे प्रत्यक्ष नगर जिल्ह्याला देखील याचा फायदा होणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे एक हजार पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, अद्याप याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडे कोणत्याच सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले.

जाणून घ्या नगर जिल्ह्यातील पदांची परिस्थिती :- जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांची एकूण 2 हजार 249 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1 हजार 314 पदे भरण्यात आली आहेत. तर तब्बल 935 पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांमध्ये प्रामुख्याने 12 वैद्यकीय अधिकारी, 506 आरोग्य पर्यवेक्षिका, 21 औषध निर्माण अधिकारी, 20 आरोग्य सहायक महिला, 292 आरोग्य सेवक पुरुष, 11 आरोग्य सहायक पुरुष, 7 आरोग्य पर्यवेक्षक 4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तसेच 54 सफाई कामगारांचा समावेश आहे.

यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी अशी महत्वाची पदे भरण्यात आलेली नाहीत. जिल्हा रुग्णालयात 306 पॅरामेडिकल कर्मचार्‍यांच्या जागा मंजूर आहेत.

त्यापैकी 209 जागा भरलेल्या असून, 97 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 च्या 50 मंजूर जागांपैकी 16 जागाच भरलेल्या असून, तब्बल 34 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 च्या 197 मंजूर जागांपैकी 136 जागा भरलेल्या असून, 61 जागा रिक्त आहेत.

नर्सिंग कर्मचार्‍यांच्या 100 जागा रिक्त असून, त्यापैकी 97 भरण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये अधिपरिचारिकांची 300 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 280 पदे भरण्यात आलेली आहेत. तर 20 पदे रिक्त आहेत. यातील 32 कर्मचारी हे कंत्राटी आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24
Top